सूर्याचीवाडीत फ्लेमिंगोना मिळाला हक्काचा निवारा

अंकुश चव्हाण
Saturday, 5 September 2020

सूर्याचीवाडी (ता. खटाव) तलावात फ्लेमिंगो पक्षी दाखल होत आहेत. सल्याची सर्वप्रथम नोंद सुरवातीपासून दै. "सकाळ'ने घेतली. दरवर्षी दाखल झालेल्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवत त्याचे वृत्ताकंन केल्याने जगाच्या नकाशावर "मायणी पक्षी संवर्धन राखीव' अंतर्गत हा तलाव राखीव केला जाणार आहे. 

कलेढोण (जि. सातारा) : पश्‍चिम महाराष्ट्रात अवघ्या दहा ते 12 एकर क्षेत्रावर असलेल्या सूर्याचीवाडी (ता. खटाव) तलावात फ्लेमिंगो पक्षी दाखल होत असल्याची सर्वप्रथम नोंद सुरवातीपासून दै. "सकाळ'ने घेतली. दरवर्षी दाखल झालेल्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवत त्याचे वृत्ताकंन केल्याने जगाच्या नकाशावर "मायणी पक्षी संवर्धन राखीव' अंतर्गत हा तलाव राखीव केला जाणार आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात पाणपक्षी व विदेशी पक्षी संवर्धनासाठी "मायणी समूह पक्षी संवर्धन राखीव' ही संकल्पना वन विभागाने आखली आहे. याबाबत मायणीत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्‍लेमेट बेन यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यात मायणी, कानकात्रे, येरळवाडी व सूर्याचीवाडी या तलावांचा समावेश करण्यात आला. सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत दक्षिण-पूर्व भागात एकूण तीन तलाव आहेत. त्यातील तलाव क्रमांक दोन हा फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध आहे. उथळ पाणी, मुबलक खाद्यान्नामुळे हे फ्लेमिंगो (रोहित, अग्नीपंख) यांचे हे आवडते ठिकाण झाले आहे. यावर्षी 20 फेब्रुवारीला तब्बल 80 फ्लेमिंगोंनी तलावावर हजेरी लावली. याबाबत "सकाळ'ने वृत्तांकन करत त्याला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली होती. 

सुरवातीपासून प्रसिद्धीपासून दुरावलेल्या या तलावाकडे पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्षिमित्र, निरीक्षक व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले. याच तलावात फ्लेमिंगोसह चित्रबलाक, नंदीमुख, काळा शराटी, नदीसुरय, चमच्या, चांदवा, चक्रवाक, शेकाट्या आदी स्थानिक पक्ष्यांचा आदिवास आहे. सुमारे 10 ते 12 एकर क्षेत्रावर असलेल्या तलावातील उथळ पाण्यात ओटेलिया, शैवाल, छोटे मासे, कीटक, सूक्ष्मजीवासह पाणवनस्पतींचा समावेश असल्याने तलावात पक्ष्यांचा आदिवास कायम असतो. तलावातील उत्तर-दक्षिण भागात उथळ पाण्यात अन्नाच्या शोधात फ्लेमिंगोंचे थवे पाहताना पक्षिप्रेमींचे मन मोहून जाते. "सकाळ'ने लक्ष वेधून घेतल्यानंतर हा तलाव वन विभागाच्या मदतीने फ्लेमिंगोंच्या हक्काचा होणार आहे. 

दै. "सकाळ'ने या तलावाला फ्लेमिंगो तलाव म्हणून नावारूपाला आणले. सांगली, पुणे, कोल्हापूर, मुंबईतून पक्षिमित्र दाखल होत असल्याने युवकांना व्यावसायिक वृद्धीसाठी चांगली संधी मिळाली आहे. 

- तौफिक तांबोळी, हॉटेल व्यावसायिक, सूर्याचीवाडी 

शेताजवळ तलाव असल्याने अनेक पक्षिप्रेमी दरवर्षी दाखल होत असताना पाहावयास मिळतात. आमच्याच परिसरात तलाव असल्याने त्याचा नावलौकिक वाढल्याचे समाधान आहे. 

- गुलाबराव जगदाळे, पोलिस पाटील, सूर्याचीवाडी 

 

संपादन ः संजय साळुंखे 
 

साताऱ्यात पंधरा दिवसांत चांगले परिणाम दिसतील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Flamingo right shelter in Suryachiwadi