मल्हारपेठे परिसरात अवैध दारूविक्री तेजीत, कागदोपत्री बंदी घातलेल्या ठोमसेतही सुळसुळाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

एरव्ही फक्त देशी दारू विकणारे चक्क वाईनशॉपमध्ये मिळणारी सर्व प्रकाराची दारूविक्री करताना दिसत असून, प्रशासन अर्थपूर्ण "मंथली'च्या हव्यासापाई कारवाई करताना चालढकल करत असल्याचे बोलले जात आहे. 

मल्हारपेठ (जि. सातारा) : परिसरातल्या ठोमसेसह सर्वच गावांत अवैध देशी दारूसह इंग्लिश दारूचीही विक्री तेजीत सुरू आहे. बंदीमध्ये तब्बल दोन महिने सैरभैर झालेल्या तळिरामांची सध्या चंगळ सुरू आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांची शेतमालकाकडून चांगली सोय केली जात आहे. माजी सैनिकांकडूनही इंग्लिश दारूची विक्री जोरात असून, त्यांच्या विक्रीवर केंद्र सरकारकडून कडक नियमावली राबविण्याची मागणी होत आहे. कागदोपत्री बंदी घातलेल्या ठोमसेत कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासाठी उंब्रज पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. 

ठोमसेत महिला व तरुणांच्या रेटयामुळे दारूबंदी झाली होती. मात्र, प्रशासनाने त्यावर अंकुश ठेवण्यात चालढकल केल्यामुळे बंद झालेली विक्री पुन्हा सुरू झाली. आजही सर्वत्र गावागावांत अशी विक्री करणारे तयार झाले असून, चढ्या दराने त्याची सर्रास विक्री सुरू आहे. परवानाधारक दुकानांमध्ये 55 रुपयांस मिळणारी देशी बाटली तब्बल 80 ते 100 रुपयांस विक्री केली जात आहे. तर माजी सैनिकांना मिळणारी व्हिस्की रमही 300 ते 500 रुपयांस विकली जात आहे. हीच बाटली संचारबंदीत 1000 ते 1200 रुपयाने विकली गेली तर देशी बाटलीही 200 ते 250 रुपयांस विकत असत. कमी भांडवलामध्ये असे व्यवसाय करणारे त्यावेळी मालामाल झाले. मात्र, दारू पिणारे कंगाल झाले, अशी परिस्थिती सर्वत्र आहे. परवानाधारक दुकानांव्यतिरिक्त गावामध्ये दारू विकण्यास परवानगी नसताना या अवैध दारूविक्री करणाऱ्यांना दारू मिळते कोठून, यावर कुणाचा वरदहस्त आहे हे शोधण्यासाठी प्रशासनाने हालचाल करण्याची मागणी अनेक सामाजिक महिला संघटनांच्यातून होत आहे. 

उरुल, ठोमसे परिसरात गेल्या महिन्यापासून अवैध दारूचा सुळसुळाट झाला आहे. एरव्ही फक्त देशी दारू विकणारे चक्क वाईनशॉपमध्ये मिळणारी सर्व प्रकाराची दारूविक्री करताना दिसत असून, प्रशासन अर्थपूर्ण "मंथली'च्या हव्यासापाई कारवाई करताना चालढकल करत असल्याचे बोलले जात आहे. यावर जरब ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागही तितकाच कारणीभूत असल्याचे अनेक महिला सामाजिक संघटनांतून सांगितले जात आहे. कारण असे व्यवसाय करणारे प्रशासनाच्या सर्व कारवाया सहन करून निगरगट्ट झाले असल्याने त्यांच्यावर फक्त नाममात्र कागदोपत्री कारवाई करून नाममात्र दंड भरून सोडले जाते. मात्र, प्रशासन ठोस कारवाई करताना का दिसत नाही, याचे कोडे मात्र सुटत नाही. तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेल्याने गावात गुन्हेगारी वाढू लागल्याने पालक वर्गात चिंता वाढू लागलेली आहे. 

पुण्या-मुंबईकरांमुळे विक्रेत्यांची चंगळ 

सध्या पुण्या-मुंबईतील चाकरमानी कोरोना संसर्गामुळे गावी वास्तव्यास असल्याने दारूविक्रेत्यांची चंगळ सुरू आहे. सध्या शिवारात भात लागण आणि कोळपणीची कामे हातघाईवर असल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे मालक चांगलीच सोय करत असल्याने दारूविक्रीला चांगलाच जोर चढला आहे. प्रशासनाने असे व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाईचा बडगा उगारून त्यांची पाळेमुळे नष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Illegal Sale Of Liquor Is Rampant In Malharpethe Area