कऱ्हाडला महिन्यात कोरोनाचे रुग्ण तिप्पट, 105 गावांत शिरकाव

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : तालुक्‍यातील 219 पैकी तब्बल 105 गावांत कोरोनाने थैमान घातले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्‍यात अवघे 300 रुग्ण होते. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एक हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात कोरोनाचे रुग्ण तिपटीने वाढले आहेत. तालुक्‍यातील तब्बल 105 गावांत एक हजार 147 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 गावांत कोरोनाचे ऍक्‍टिव्ह रुग्ण असल्याने तब्बल 75 गावांत आरोग्य विभाग रोजची आरोग्य तपासणीही करत आहे. 

तालुक्‍यातील 105 गावांत 71 कंटेनमेंट झोन आहेत. त्यामध्ये तब्बल तीन लाख 52 हजार 686 नागरिकांना झळा सोसाव्या लागत आहेत. त्या प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये रोजच्या सर्व्हेसाठी एक हजार 156 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यावर 226 पर्यवेक्षक नजर ठेवून आहेत. 71 कंटेनमेंट झोनमध्ये तब्बल 531 खासगी दवाखानेही आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त दवाखाने रोजचे सुरू आहेत. ते अन्य रुग्णांची तपासणी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा कहर रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

मात्र, तालुक्‍यात समूह संसर्गाची लागण होऊ लागल्याने अवघ्या महिनाभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. तालुक्‍यातील तब्बल 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात कोरोना पसरला आहे. त्यामुळे त्या त्या भागात "हाय अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी 71 कंटेनमेंट झोन जाहीर केलेले आहेत. त्यात तब्बल तीन लाख 52 हजार 686 इतकी लोकसंख्या आहे. सर्वाधिक रुग्ण कऱ्हाड शहरात आहेत. शहरात तब्बल 208 रुग्ण आहेत. त्या खालोखाल मलकापुरात 158, चोरे 39, तारूख 54, तुळसण 25, कार्वे 22, वडगाव हवेली 21 असे कोरोनाचे रुग्ण आहेत. 


शहरात सर्वाधिक मृत्यू 

तालुक्‍यात कोरोनाबाधित 105 गावे आहेत. त्यात हॉटस्पॉट असलेली 25 गावे आहेत, तर 70 पेक्षा जास्त गावांत कोरोनाचे ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्‍यात विविध गावांत 71 कंटेनमेंट झोन आहेत. तालुक्‍यामध्ये आजअखेर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय मलकापूर, म्हारूगडेवाडी, उंब्रज-वडगाव, तारूख, सैदापूर, गोवारे, चिखली, लटकेवाडी, कालगाव व वडगाव हवेली येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com