
सातारा : ‘किसन वीर’चे १०० कोटींचे भागभांडवल जमवणार
सातारा: किसन वीर कारखान्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कारखान्याचे भागभांडवल शंभर कोटी करण्याचे उद्दिष्ट नूतन संचालक मंडळाने घेतले आहे. त्यानुसार वाई तालुक्यातून भागभांडवल तयार करण्यासाठी गावनिहाय सचिव, बॅंकेचे विकास अधिकारी व कारखान्याचे शेती अधिकारी यांची टीम करून सभासदांची कर्ज प्रकरणे तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज कारखान्याचे संचालक व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालकांनी घेतला.
वाईत आज किसन वीर कारखान्याचे संचालक व नितीन पाटील यांनी तालुक्यातील सभासदांची बैठक घेतली. या वेळी किसन वीरचे एमडी श्री. शिंदे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, कारखान्याचे अधिकारी, तसेच सर्व संचालक उपस्थित होते. बैठकीत संचालक नितीन पाटील यांनी कारखान्याचे भागभांडवल वाढवून ते शंभर कोटी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामध्ये वाई तालुक्यातील सभासदांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. भागभांडवल जमा करताना जिल्हा बँकेच्या मध्यम मुदत कर्जाचा व्याजदर आठ टक्के झाला आहे. यातून सभासदांच्या नावे कर्ज घेऊन हे भागभांडवल वाढविले जाणार आहे.
बैठकीत सोसायटीच्या माध्यमातून भागभांडवल उभे करण्याचे नियोजन झाले. त्यासाठी गावनिहाय सभासदांची प्रकरणे करून घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी एक सचिव, विकास अधिकारी व कारखान्याचा शेती अधिकारी अशी टीम तयार करून त्या त्या गावांतील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते घेऊन बैठक करण्याची सूचना नितीन पाटील यांनी केली. कर्जासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी सभासद शेतकऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाचही तालुक्यांत अशाप्रकारे बैठका घेऊन स्वतः नितीन पाटील घेणार आहेत. यातून शंभर कोटींचे भागभांडवल उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले.
Web Title: Satara Kisan Veer Factory Raise
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..