Satara : कोरेगाव संघ बिनविरोधचे प्रयत्न असफल

१५ पैकी दोन जागा बिनविरोध; उर्वरित १३ जागांसाठी २३ अर्ज रिंगणात
Election
ElectionSakal

कोरेगाव : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या १५ जागांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल ठरले. शेवटी १५ पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या, तर १३ जागांसाठी २३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. निवडणूक रिंगणात उतरलेल्या २३ उमेदवारांची अंतिम यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर १५ जागांसाठी ७५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात सर्वसाधारण गटातील दहा जागांसाठी ५२, महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी दहा, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील एका जागेसाठी चार, नागरिकांचा इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी पाच व भटके विमुक्त मतदारसंघातील एका जागेसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

गेल्या काही वर्षांपासून संघाची आर्थिक स्थिती खाली खाली येऊ लागली होती. त्यामुळे संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सूर सभासद, शेतकऱ्यांतून व्यक्त होत होता. राजकीय नेते आणि कार्यकर्तेही त्याच मन:स्थितीत होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचालींना वेग आलेला होता. त्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, मुंबई बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर, भारतीय जनता पक्षात नुकतेच दखल झालेले भीमराव पाटील, किरण बर्गे, काँग्रेसचे मनोहर बर्गे, तानाजीराव शिंदे आदींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न केले. मात्र, त्यात यश मिळू शकले नाही. अखेर १३ जागांसाठी २३ उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत. निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी उद्या सकाळी ११ वाजता लावून, त्यानंतर चिन्ह वाटप होईल. दहा डिसेंबर रोजी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार असून, ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोरेगावच्या सहायक निबंधक प्रीती काळे यांनी सांगितले.

दरम्यान, कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेतील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सोळशी या गावातून या निवडणुकीसाठी तब्बल तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, हे तिन्ही अर्ज रिंगणात उरल्याचे समजते.

दोन जागा बिनविरोध

संघाच्या नागरिकांचा इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी पाच, भटके विमुक्त मतदारसंघातील एका जागेसाठी चार उमेदवार अर्ज दाखल झाले होते. मात्र, या दोन्ही प्रवर्गात आज प्रत्येकी एक एक अर्ज उरल्याने या जागांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, बिनविरोध झालेल्या संचालकांची नावे समजू शकली नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com