Krishna Election Result Live : मतमाेजणी प्रक्रियेस प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Krishna Sugar Factory

Krishna Election Result Live : मतमाेजणी प्रक्रियेस प्रारंभ

कऱ्हाड (जि. सातारा) : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या सत्तेचा फैसला आज (गुरुवारी) होणार आहे. अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढतीत कारखान्यासाठी मंगळवारी (ता.29) ९१ टक्के मतदान झाले. प्रत्येक निवडणुकीतील सरासरीपेक्षा १० टक्के मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे वाढीव मतदानाची कृष्णा काठावर चर्चा रंगली आहे. कराड शहरातील वखार महामंडळाच्या गाेदामात (ता. कराड) या ठिकाणी मतमाेजणी प्रक्रियेच्या कामकाजास प्रारंभ झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मतमाेजणी पूर्ण होईल असा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी व्यक्त केला आहे. (satara-krishna-sugar-factory-election-2021-result-live-update)

कृष्णा कारखान्याच्या आजवरच्या निवडणुका चुरशीने झाल्या आहेत. कोरोनाचे संकट असतानाही या निवडणुकीत मृत सभासद वगळल्यास ९१ टक्के मतदान झाले आहे. एकूण ४७ हजार १४५ पैकी ३४ हजार ५३२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उत्स्फूर्त मतदान झाल्याने सभासदांनी नेमका कोणाला कौल दिला, याची आकडेमोड तिन्ही पॅनेलचे समर्थक करत आहेत.

दरम्यान, मागील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता मतमोजणी प्रक्रियेवेळी कोणताही वाद होऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर व पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी तिन्ही पॅनेलच्या समर्थकांची बैठक घेऊन मतमोजणी कशी होणार, याची माहिती दिली.

हेही वाचा: शिक्षण विभागाचा साता-यातील शाळेस झटका; मान्यता केली रद्द

आज (गुरुवार) सकाळी सात वाजता मतमाेजणीसाठी फक्त प्राधिकृत केलेल्या मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात आला . एकूण ७४ टेबलावर मतमोजणी होणार असून, त्यासाठी सुमारे ३२५ अधिकारी नेमले आहेत. प्रत्येक टेबलवर दोन फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. पहिली पेटी दिल्यानंतर त्यातील मतपत्रिकांची हिशोबाप्रमाणे पडताळणी करण्यात येणार आहे. गटनिहाय गठ्ठे केल्यानंतर प्रथम अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, महिला राखीव व त्यानंतर गट १ ते ६ गटांची मतमोजणी होणार आहे. यात एक जागा असणाऱ्या दोन राखीव गटांचा निकाल सर्वप्रथम लागणार असल्याचेही श्री. आष्टेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: कृष्णा कारखाना निवडणुक: सहकारसह संस्थापक पॅनेलवर गुन्हा दाखल

टॅग्स :Satara