कोयना धरण परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांत घबराट

विजय लाड
Tuesday, 19 January 2021

कोयना अभयारण्यामुळे कोयनेचा परिसर हा वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान झाले आहे. चार-पाच महिन्यांपासून अनेक वन्यप्राण्यांचा वावर कोयना धरण परिसरात वाढला आहे.

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरणाच्या भिंतीसमोरच धरणाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस चौकीजवळच एका बिबट्याचे काल रात्री दर्शन झाले. जवळच असलेल्या कोयनानगर वसाहतीत हा बिबट्या कधीही येऊ शकत असल्याने वन्यजीव विभागाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

कोयना अभयारण्यामुळे कोयनेचा परिसर हा वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान झाले आहे. चार-पाच महिन्यांपासून अनेक वन्यप्राण्यांचा वावर कोयना धरण परिसरात वाढला आहे. यात बिबट्या, कोल्हा, अजगर, रानडुक्कर यांचा समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी कोयना धरणाच्या भिंतीवर बिबट्या दिसला तर धरणाच्या वक्र दरवाज्याजवळ नऊ फूट लांब अजगर आढळले. त्यामुळे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

साता-यात बर्ड फ्लू; तीन महिने काेंबडी, चिकन, अंडी विक्रीवर बंदी 

काल रात्री दहाच्या सुमारास कोयना धरण परिसरात 28 नंबर चौकीजवळ बिबट्याचे दर्शन झाले. रात्रगस्तीवर असणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी व पोलिस कर्मचाऱ्यांनी हा बिबट्या बघितला. मानवी वसाहतीपासून हे ठिकाण जवळच असल्याने संध्याकाळी शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या कोयनावासीयांनी सतर्क राहावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक माळी यांनी केले आहे. बिबट्याचा बंदोबस्त वन्यजीव विभागाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

उदयनराजेंच्या त्या कृतीची पोलिसांकडे माहिती गोळा; गृहराज्यमंत्र्यांचा निर्वाळा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Latest Marathi News Panic Among Citizens Due To Leopard In Koyna Dam Area