या गावात ग्रंथालयाची पुस्तके विद्यार्थ्यांना घरपोच

karad
karad

उंडाळे (जि. सातारा) ः शालेय ग्रंथालयाची पुस्तके घरपोच उपलब्ध करून देणारा "अक्षरवारी ग्रंथालय आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम येथील स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने राबवला जात आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिक्षण घेणे शक्‍य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीचे जतन व्हावे आणि शाळेत लागलेली वाचनाची सवय कायम राहावी, अवांतर वाचनाने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंद व्हाव्यात या हेतूने दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना वाचनासाठी घरी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. 

शिक्षकांच्या मदतीने आठवड्यातून एकदा पुस्तकांचे संच विद्यार्थ्यांना घरी पोच केली जातात. त्या गावातील एक विद्यार्थी "अक्षर दूत' म्हणून निवडला आहे. पुस्तके तिथेच ठेऊन त्या गावातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके "अक्षर दूता'मार्फत वितरित केली जातात. विद्यार्थीही "अक्षर दूता'कडून पुस्तक घेऊन जातात. पुढील आठवड्यात हे संच बदलले जातात. अगदी वाडी-वस्तीपर्यंत या उपक्रमामुळे पुस्तके पोचली आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही वाचण्यासाठी प्रवृत्त होऊ लागले आहेत. 

याविषयी ग्रंथपाल अंजली देशमुख म्हणाल्या, ""विद्यार्थ्यांना ऑनलाइन पीडीएफ पुस्तके, ऑडिओ कथा, कादंबरी, विविध भाषणे, मागणीनुसार ई- संदर्भही व्हॉटसऍप ग्रुपवर पाठवले जातात. त्याबरोबर रोज एक बोधकथा व एक कविता असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.'' 


उपलब्ध वेळ पुस्तक वाचण्यासाठी दिल्यास विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढून सर्वांगीण विकास होण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होणार आहे. 

- बी. पी. मिरजकर, प्राचार्य 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com