दारूची पार्सल सुविधा निसर्गाच्या मुळावर, निर्जन ठिकाणे दारूड्यांसाठी बनलीत "हॉटस्पॉट'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

दारूड्यांचा रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू असल्याने शांतता भंग पावत आहे. या दारूड्यांना वेळीच रोखले नाही तर बाटल्यांमुळे पायी चालत जाणे मुश्‍किल होणार आहे. तसेच काचा, प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने निसर्गाची अपरिमित हानी होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. 

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरोनामुळे सरकारने दारूच्या पार्सलचा घाट घातला असल्याने रानोमाळासह अनेक निर्जन ठिकाणे दारूड्यांसाठी "हॉटस्पॉट'बनली आहेत. दारूची पार्सल सुविधा आता निसर्गाच्या मुळावर उठू लागली आहे. 

संचारबंदी जाहीर झाली आणि सर्वच उद्योगांप्रमाणे दारू दुकानेही लॉकडाउन झाली. त्यामुळे मद्यपींची मोठी तडफड झाली असली तरी घरात शांतता नांदू लागल्याने महिला वर्गाला मोठे समाधान मिळाले होते. मात्र, दारूभोवती मोठे अर्थकारण फिरत असल्याने 13 मे पासून जिल्ह्यातील वाईन शॉप व देशी दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. मात्र, कंटेनमेंट झोनमधील दुकाने बंद ठेवण्याची अट घालण्यात आली. दुकाने सुरू झाल्याने जवळपास दोन महिने उलघाल झालेल्या तळिरामांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. दारूची तल्लफ पुरी करण्यासाठी अनेकांनी दुकानांपुढे रांगा लावल्या. केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असल्यामुळे दारूच्या बाटल्या घेऊन जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता खरी अडचण झाली ती पार्सल आणलेली दारू पिण्याची. मग दारूसोबत चकना, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक ग्लास, सिगारेट, माचीस, सोडा आणि शीतपेय असा सर्वच लवाजमा गोळा करण्यासाठी धावाधाव सुरू झाली. हॉटेल बंद असल्याने दारूच्या बैठका बंद खोलीऐवजी आता मोकळ्या जागेत रंगू लागल्या. रस्त्याच्या कडेला, झाडाच्या गर्द सावलीत, शेतात, फार्महाउसवर रात्रंदिवस मैफली झडू लागल्या. मात्र, रिचवलेल्या मोकळ्या बाटल्या रानोमाळ पडू लागल्या आहेत. त्यामुळे ही पार्सल सुविधा आता निसर्गाच्या मुळावर उठू लागली आहे. फुटलेल्या बाटल्यांच्या काचा शेतकरी व जनावरांना अपायकारक ठरू लागलेल्या आहेत. अनेक निर्जन ठिकाणे दारूड्यांसाठी "हॉटस्पॉट' बनली आहेत. अशा ठिकाणी स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दारूड्यांचा रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू असल्याने शांतता भंग पावत आहे. या दारूड्यांना वेळीच रोखले नाही तर बाटल्यांमुळे पायी चालत जाणे मुश्‍किल होणार आहे. तसेच काचा, प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने निसर्गाची अपरिमित हानी होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. 

""दारू पार्सल आणून रस्त्याकडेला झाडाखाली तळिरामांच्या बैठका सुरू असतात. मोकळ्या बाटल्या, ग्लास, खाण्यासाठी आणलेले पदार्थ तेथेच टाकून बेवडे पसार होतात. काहीजण मोकळ्या झालेल्या बाटल्या दगडाने फोडून टाकतात. त्यामुळे सर्वत्र काचांचा खच दिसू लागला आहे. काचांमुळे इजा होत असून, शेतात ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे. दारूड्यांना हुसकावून लावावे लागत आहे.'' 

-पुरुषोत्तम लेंभे, दुग्ध व्यावसायिक, पिंपोडे बुद्रुक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Liquor Parcel Facilities Are Dangerous To Nature