सातारा : नवख्यांचा दिग्गजांना धक्का

महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत झालेल्या लढतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरीsakal

सातारा : महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत झालेल्या लढतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. चढाया-प्रतिचढायांनी लढती रंगत गेल्या आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाही चुकला. खचाखच भरलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात सकाळच्या सत्रात काटा-जोड लढती झाल्या. या सामन्यांमध्ये अनेक दिग्गजांना पराभूत करत नवख्यांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत स्थान पटकावले.

पृथ्वीराज आक्रमक, हर्षद निष्प्रभ...

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील व पुणे शहरचा हर्षद कोकाटे यांच्यातील लढत कशी होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. लढत सुरू झाल्यानंतर एक मिनीट संपला तरी दोन्ही पैलवानांना एकही गुण घेता आला नाही. त्यानंतर पृथ्वीराजने एकेरी पटावर दोन गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज आक्रमक झाला. त्याने भारंदाज डावावर सहा गुण मिळवले. त्याच्यासमोर हर्षद निष्प्रभ ठरला. ही लढत जिंकून पृथ्वीराजने प्रेक्षकांची मने जिंकली.

विशाल सिकंदरवर पडला भारी...

माती विभागात वाशीमचा सिकंदर शेख विरुद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात काटा-जोड लढत झाली. दोन्ही पैलवान शाहू विजयी गंगावेस तालमीचे असले, तरी त्यांनी अटीतटीची लढत दिली. सिकंदरने चार गुण मिळविल्यानंतर विशालने त्याला जोरदार प्रत्युत्तर देत चार गुण वसूल केले. सिकंदरने टांग डावावर पुन्हा दोन गुण मिळवून आघाडी घेतली. विशालला दोन वेळा सर्कल बाहेर काढून त्याने दोन गुण खात्यावर जमा केले. विशालने दोन गुण मिळविल्याने पहिल्या फेरीत ८ विरुद्ध ६ गुण फलक झाला. दुसऱ्या फेरीत एकेरी पटावर सिकंदरने दोन गुण मिळवले. त्यानंतर मात्र विशालच्या झंजावातापुढे त्याचे डावपेच फोल ठरत गेले. विशालने तब्बल सात गुण मिळवून सिकंदरला मात दिली.

तत्पूर्वीच्या लढतीत काय घडले..?

...अन् हर्षदचा आत्मविश्वास ढळला

बीडचा अक्षय शिंदे विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांच्यातील लढतीत पहिल्या मिनिटात दोन्ही पैलवानांना एकही गुण मिळवता आला नाही. अक्षय संथगतीने लढत करत असल्याने पृथ्वीराजला एक गुण बहाल करण्यात आला. त्यानंतर पृथ्वीराजने अक्षयवर ताबा घेत दोन गुण मिळवले. पहिल्या फेरीत ३-० असा गुणफलक होता. दुसऱ्या फेरीत अक्षयने दोन गुण मिळवले. पृथ्वीराजने भारंदाजवर सहा गुण वसूल केल्यानंतर हर्षदचा आत्मविश्वासच ढळला.

उत्कंठा वाढली अन् हर्षवर्धनच हरला...

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पुणे शहरचा हर्षद कोकाटे यांच्यातील कुस्ती लढत प्रेक्षणीय झाली. हर्षवर्धनने सुरवातीला एक गुण मिळविला. त्यानंतर दोघे आक्रमक झाले. हर्षवर्धनने पुन्हा दुसरा गुण घेतला. हर्षदने एकेरी पटावर दोन गुणांची कमाई केल्याने पहिल्या फेरीत २-२ असे गुण झाले. दुसऱ्या फेरीत हर्षदने एक गुण मिळवला. त्याने हर्षवर्धनला गुण मिळू देण्याची संधी दिली नाही. त्यानंतर हर्षदने हर्षवर्धनवर पकड घेत दोन गुण मिळवले. हर्षवर्धनने तीन गुण मिळवून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. हर्षदने दोन गुण मिळवून सात गुणांवर आघाडी घेतली. पूर्णवेळेत हीच स्थिती राहिली.

सिकंदर विरुद्ध माऊलीचा सॉफ्ट कॉर्नर...

माती विभागात अमरावतीचा माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर जमदाडे विरुद्ध वाशीमचा सिकंदर शेख यांच्यातील लढतीत पहिला मिनीट संपला तरी दोन्ही पैलवानांना एकही गुण घेता आला नाही. सिकंदरने एकेरी पटावर दोन गुण मिळवल्यानंतर माउलीने एक गुण वसूल केला. त्याचा एकेरी पटाचा प्रयत्न धुडकावून सिकंदरने एक गुण मिळवला. या फेरीत माउलीला एक गुण मिळवता आला. दुसऱ्या फेरीत सिकंदरने ७ विरुद्ध २ गुण मिळवून लढतीत विजय मिळवला.

विशालचा लपेट डावावर महेंद्रला धक्का...

सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात शरीराने तगडा असणाऱ्या महेंद्रवर विशाल भारी पडला. पहिल्या फेरीत महेंद्र व विशाल यांनी प्रत्येकी एक गुण मिळवला. दुसऱ्या फेरीत या दोघांनी एक-एक गुणांची कमाई केली. त्यानंतर विशालने लपेट डावावर चार गुण मिळवून महेंद्रला धक्का दिला. विशालने ही लढत ७ विरुद्ध २ गुण फरकाने जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com