घोंगडी अन्‌ घोंगडीची ऊब झाली दुर्मिळ!, मेंढपाळ व्यवसाय अडचणीत आल्याचा परिणाम

Satara
Satara

कुकुडवाड (जि. सातारा) : पावसाळा, थंडीमध्ये ब्लॅंकेट, रग, चादरींना मागणी वाढते. ग्रामीण भागात पावसाळ्यात पावसाच्या पाण्यापासून निर्माण होणाऱ्या थंडीत घोंगडीपासून ऊब मिळते. मात्र, मेंढपाळ व घोंगडी बनविण्याचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय अनेक कारणास्तव अडचणीत आल्यामुळे आता खात्रीने ऊब देणारी घोंगडी आणि घोंगडीपासून मिळणारी ऊब दुर्मिळ होत आहे. 


घोंगडी बनविण्याचा व्यवसाय अनेक कारणास्तव अडचणीत आल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिक आणि मेंढपाळ सांगत आहेत. हा व्यवसाय विशेषत: धनगर आणि सणगर समाजातील लोक करतात. हातमाग (विणकाम) करून घोंगडी बनवतात. मात्र, घोंगडीची बाजारपेठेत मागणी कमी झालेली आहे. ज्यांच्याकडे मेंढ्या आहेत, त्यांना लोकर (मेंढ्यांचे केस) विकत घेण्याची गरज पडत नाही. एक घोंगडी बनवण्यासाठी चार ते पाच किलो लोकर लागते. लोकर कातून विणकाम केले जाते. त्यानंतर चिंचोक्‍याची खळ लावून घोंगडी बनविली जाते. बाजारपेठेत एका घोंगडीला सरासरी 700 ते एक हजार रुपयांपर्यंत किंमत मिळते. 
एक घोंगडी बनविण्यासाठी किमान एक दिवसाचा अवधी लागतो. या एका घोंगडीमागे साधारणत: 200 ते 300 रुपयांचे उत्पन्न या व्यावसायिकांना मिळते, असे यातील जाणकारांनी सांगितले.

ग्रामीण भागात काळ्या (देशी) मेंढ्यांना लांब व मुलायम रेशमासारखी लोकर मिळते. आज संकरित आणि माडग्याळ जातीच्या देखण्या मेंढ्या पाळण्याकडे मेंढपाळ व्यावसायिक वळलेले असल्याने लोकरही मिळेनाशी झाली आहे. माडग्याळ (पांढऱ्या) मेंढ्यांची लोकर खुरटी, चरबट आणि ताट असल्याने ती बिनकामी ठरत आहे. निसर्गाच्या लहरीपणा, साथीच्या आजार आणि जमिनीचे तुकडीकरण झाल्याने मेंढपाळ व्यवसाय संकटात सापडल्याने घोंगडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल लोकर मिळत नसल्याने हातमाग कामाद्वारे घोंगडी बनवण्याचा व्यवसाय कमी झाला आहे. आजही घोंगडीला विशेष महत्त्व आहे. घोंगडीचा वापर बिरोबा, खंडोबाची तळी उचलण्यासाठी व धार्मिक कामासाठीही केला जातो. आता ग्रामीण भागातही घोंगडीचा वापर कमी झाल्याचे दिसत आहे. घोंगडीचा वापर केल्यास कंबरदुखी, पाठदुखी 
कमी होते, असा दावाही केला जातो. 


नवीन पिढीने पाठ फिरविली 

ग्रामीण भागात परंपरागत चालत आलेल्या या मेंढपाळ व्यवसायाकडे नवीन पिढीने पाठ फिरवली आहे. घोड्यावर बिऱ्हाड भरून परमुलकामध्ये जाऊन संसाराचा रहाटगाडा ओढायला नववधूही धजावत नसल्याने मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस आला आहे. साथीचे आजार, महागडी औषधे आणि वापरण्याचे मेंढपाळांचे अज्ञान यामुळे मेंढपाळ व्यवसायाला घरघर आल्यामुळे घोंगडी व्यसायावरही चांगलाच परिणाम झालेला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com