वाद घालणाऱ्या शिक्षकांच्या होणार बदल्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

याच बैठकीत आरोग्य विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सदस्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

दहिवडी : महिमानगड केंद्राचे केंद्रप्रमुख हणमंत कदम यांच्यावरील कारवाईच्या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल आहे. त्यांचे काम चांगले असून, त्यांना परत केंद्रप्रमुख म्हणून माणमध्ये घेण्यात यावे, असा ठराव माण पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला, तसेच वरकुटे-मलवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील वाद असलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्या, असाही निर्णय घेण्यात आला.
 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज माण पंचायत समितीची मासिक सभा गोल इमारतीत न घेता सुरक्षित अंतर ठेऊन बचत भवनात घेण्यात आली. या बैठकीस सभापती कविता जगदाळे, उपसभापती तानाजी कट्टे, गटविकास अधिकारी गोरख शेलार, सदस्य रमेश पाटोळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, तानाजी काटकर, रंजना जगदाळे, चंद्राबाई आटपाडकर, अपर्णा भोसले, सहायक गटविकास अधिकारी भरत चौगले यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
नितीन राजगे यांनी पिंपरी गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, कोरोना व्यवस्थापन समितीतील प्रशासकीय कर्मचारी उपस्थित राहात नसल्याकडे लक्ष वेधले. फक्त आशा स्वयंसेविकांनाच कामासाठी पळवलं जातंय, असे ते म्हणाले. रमेश पाटोळे यांनी अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार पोचला नाही. त्यात गोलमाल आहे असा आरोप करतानाच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा कारभार ढिसाळ असल्याचा ठपका ठेवला. 
 
समाजकल्याण विभागाच्या निधीमधून शिलाई मशिन देण्याऐवजी घरघंटी द्याव्यात, असा निर्णय या वेळी घेण्यात आला, तसेच सध्या रोजगार हमी योजनेतील 48 कामांवर 393 मजूर काम करत आहेत. मात्र कुशलचा निधीच उपलब्ध नाही. कोरोनामुळे बाहेरून आलेल्या येथील रहिवाशांच्या हाताला काम नाही. त्यांना मनरेगातून काम मिळाले पाहिजे, अशी मागणी तानाजी काटकर यांनी केली. गावागावांत निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली आहे. मात्र, त्याचा खर्च काही ग्रामपंचायतींनी अवास्तव लावला आहे, असा आक्षेप घेण्यात आला. कुकुडवाड येथे तीन वेळच्या फवारणीचा खर्च 54 हजार रुपये दाखवला आहे, तसेच खरीप हंगाम तोंडावर आला असताना विकास सोसायट्यांकडून कर्ज वाटप करण्यात आलेले नाही, असे रमेश पाटोळे म्हणाले. जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी विजयकुमार मगर यांनी केली. पंचायत समितीचे ज्येष्ठ सदस्य पांडुरंग सोळसे यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

माणमध्ये 13 पॉझिटिव्ह 

आरोग्य विभागाकडून कोरोनासंदर्भात आढावा देण्यात आला. माणमध्ये आजपर्यंत 17 कोरोना रुग्ण सापडले असून, त्यांच्या संपर्कात 79 हाय रिस्क व 27 लो रिस्क व्यक्ती होत्या. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केलेल्या 496 पैकी 437 व्यक्ती घरी पाठविण्यात आल्या आहेत. सध्या 50 व्यक्ती क्वारंटाइन आहेत. होम क्वारंटाइन नऊ हजार 228 व्यक्तींचे चौदा दिवस पूर्ण झाले असून, पाच हजार 244 व्यक्तींचे चौदा दिवस पूर्ण झालेले नाहीत. स्वॅब घेतलेल्या 84 नमुन्यांपैकी 13 पॉझिटिव्ह, 61 निगेटिव्ह, तर 11 प्रतीक्षेत आहेत. आजपर्यंत दोन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले.

ती म्हणते लाॅकडाऊनमुळे नात्यांची वीण झाली घट्ट

राज्यातील शिक्षकांपुढे आता मान्यतेचे आव्हान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mann Panchyat Samiti Decidied To Transfer Misbeavehing Teachers To Other Schools