esakal | प्रांताधिका-यांचा आदेश; आठ मे पर्यंत दवाखाने, मेडिकल वगळता सर्व बंद
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

प्रांताधिका-यांचा आदेश; आठ मे पर्यंत दवाखाने, मेडिकल वगळता सर्व बंद

sakal_logo
By
किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच चालला असून त्यास रोखण्यासाठी फलटण शहरासह आठ गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. आठ मे अखेर दवाखाने व मेडिकल वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी फलटण शहरासह हॉटस्पॉट ठरलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावेही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या गावांमध्ये दवाखाने व मेडिकल वगळता अन्य कुठल्याही प्रकारची दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. तसेच वैद्यकीय शिवाय अन्य कुठल्याही कारणाने नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. आठ मे पर्यंत सर्व व्यवहार बंद राहतील. या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दूध, भाजीपाला, किराणा, औषधे या जीवनावश्‍यक वस्तू नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी ग्रामपंचायतींद्वारे नियोजन करण्यात आले आहे. फलटण शहरात विभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गरजेच्या वस्तू घरपोच सेवा देणाऱ्या विक्रेत्यांची यादीही फलटण नगरपालिकेने प्रसिध्द केली आहे. फलटण शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आल्याने या कालावधीत रविवारी भुसार मार्केट व मंगळवारी कांदा मार्केट बंद राहणार आहे. तर फळे व भाजीपाला मार्केट नियमितपणे सुरू राहील, असे फलटण बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.

बंद शटरमागून व्यवसाय सुरूच

शहरासह ग्रामीण भागात अर्धवट शटर उघडून, दुकानाबाहेर बसून अथवा मागील दाराने अशा विविध प्रकारांनी अनेक दुकानदार व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोन ज्या उद्देशाने घोषित करण्यात आला आहे, त्यालाच हरताळ फासणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणे आवश्‍यक असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच

'शिवभोजन' सर्वसामान्यांचा आधार; लाखाे नागरिक घेताहेत आस्वाद

loading image
go to top