कऱ्हाड : गदारोळातच 134 कोटी 79 लाख 20 हजारांचा अर्थसंकल्प मंजूर

कऱ्हाड : गदारोळातच 134 कोटी 79 लाख 20 हजारांचा अर्थसंकल्प मंजूर

कऱ्हाड : पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील चुकीच्या तरतुदी फेटाळून जनशक्ती आघाडीने उपसूचनेद्वारे मांडलेला अर्थसंकल्प पालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बहुमताने मंजूर झाला. नगराध्यक्षांनी मांडलेला अर्थसंकल्प निर्थरक आहे, त्यात कोणतीही वाढीव उत्पन्नाची तरतूद नाही, अशी भूमिका घेत लोकशाही आघाडीने अर्थसंकल्पाला विरोध केला. त्यामुळे या सभेतही बहुमत अल्पमतावरून गदारोळ झाला. त्याच गदारोळात 134 कोटी 79 लाख 20 हजारांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. नगराध्यक्षा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.
 
नगराध्यक्षा शिंदे यांनी सभागृहात दोन कोटी 8 लाख 90 हजारांचा शिलकी अर्थसंकल्प मांडला. त्यावर लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी हरकत घेतली. श्री. पाटील म्हणाले, ""आताच्या अर्थसंकल्पात वाढीव उत्पन्नाचा स्त्रोत नाही. तीन वर्षांपासून पालिकेच्या जाहिरात होर्डिंग, करमणूक कराचेही उत्पन्न बुडाले आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह खासदार येथे आहेत. त्यांच्याकडे विकासकामासाठी निधी मागण्यासाठी पालिका म्हणून कोणीच गेलेले नाही. त्यांनी भरीव निधी दिला असता मात्र, पालिकेत ती मानसिकता नव्हती. त्याउलट क्रीडांगण, पार्किंग व रस्त्याचे पैसे परत गेले आहेत. असेल ते पेटवा, नसेल ते भेटवा अशा मानसिकतेत पालिकेत काम चालते आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे जेथून पैसे येणार तेथे प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याउलट मैदानाचे भाडे वाढवून दात टोकरून पोट भरण्याचा प्रकार होत आहे. वाढीव उत्पन्नाच्या कोणत्याही तरतुदींचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. त्यावर भर अपेक्षित होता. तो दिलेला नाही. त्यामुळे आपण नागरिकांचा विश्वासघात करतो आहोत, हीच भावना होत आहे.'' 

सौरभ पाटील म्हणणे मांडत असताना त्याचे उत्तर कोणी द्यायचे यावरून जनशक्ती व भाजपमध्ये जोरात हमतरीतुमरी झाली. त्याच गदारोळात जनशक्तीने नगराध्यक्षांची सूचना फेटाळून त्याला उपसूचना मांडली. गटनेते राजेंद्र यादव यांनी सूचनेतील चुकीच्या गोष्टी नामंजूर करत ती उपसूचना वाचली. त्यांनी उपसूचनेत तरतुदी सांगितल्या. त्यात फीश मार्केट, आधुनिक फायर स्टेशन इमारत, यशवंतराव चव्हाण शिल्पसृष्टी, तीन बागांचा विकास, शहरात सोलर सिस्टिम, शहरासाठी संरक्षक भिंत, मल्टीपल पार्किंगची सोय, स्टेडियमसाठी निधीची तरतूद त्यांनी केल्याचे स्पष्ट केले. उपसूचनेनंतर सूचना फेटाळू नये, असा नगराध्यक्षा शिंदे, नगरसेवक विनायक पावसकर, फारूक पटवेकर यांनी आग्रह धरला. त्यावरून जोरदार वाद झाला. त्यामुळे जनशक्ती आघाडीने उपसूचना मांडण्याची आग्रही भूमिका घेतली. सूचना मताला टाका, अशी मागणी जनशक्तीने केली. मात्र, त्यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे जनशक्तीची उपसूचना बहुमताने मंजूर झाली.

कऱ्हाडकरांनाे! पैसे वाचवायचे आहेत? तीन अटींची अंमलबजावणी करा 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com