रिक्षाचालकांनाे! सरकार तुमच्या खात्यात पैसे करणार जमा; चला तर मग करा नाेंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

auto rickshaw driver

रिक्षाचालकांची ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या लिंकमध्ये अचूक माहिती भरल्यानंतर खात्यावर रक्कम जमा होणार आहे. माहिती भरताना परवानाधारक रिक्षाचालकांना आधार कार्डचा नंबर आवश्‍यक असेल अशी माहिती विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा यांनी दिली.

रिक्षाचालकांनाे! सरकार तुमच्या खात्यात करणार पैसे जमा

सातारा : कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन (lockdown) केल्याने अनेकांच्या आर्थिक उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर आला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने परवानाधारक रिक्षाचालकांना (auto rickshaw driver) दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. याबाबत प्रणाली तयार करण्यात आली असून, शनिवारपासून (ता. 22) परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाइन माहिती भरल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यातील अधिकृत सहा हजार 500 रिक्षाचालकांना आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती परिवहन खात्याकडून देण्यात आली आहे. satara-marathi-news-rto-appeals-autorickshaw-driver-fund-1500

गेल्या वर्षी मार्च ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत संपूर्णपणे लॉकडाउन केल्याने अनेक व्यवसाय ठप्प होते. त्याचा रिक्षा धारकांनादेखील मोठा फटका बसला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यापर्यंत कोरोना काही प्रमाणात नियंत्रित आल्यानंतर सर्व व्यवसाय सुरळीत झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून राज्यभरात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. या काळात पुन्हा एकदा रिक्षा व्यवसाय बंद पडल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य शासनाने विविध घटकांना अनुदान जाहीर केले असून, त्यात रिक्षा परवानाधारकांचादेखील समावेश आहे.

हेही वाचा: तुमच्या वाट्याचा स्लॉट कोण चोरतंय? वाचा कोविनवरील स्लॉट बुक्ड होण्यामागचं नेमकं कारण

याबाबत परिवहन विभागाने सर्व परवानाधारक रिक्षाचालकांना आपले बॅंक खाते लिंक करण्याचे आवाहन केले होते. रिक्षा परवानाधारकांना थेट खात्यात अनुदान मिळणे सुलभ होणार आहे. संबंधितांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम जमा करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रणाली विकसित करण्यात येत होती. त्यानुसार आयसीआयसीआय बॅंकेमार्फत प्रणाली विकसित करण्यात आली असून, येत्या शनिवारपासून परवानाधारक रिक्षाचालकांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. याबाबत रिक्षाचालकांना ऑनलाइन माहिती भरताना विविध सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरटीओ विभागाने केले आहे.

हेही वाचा: कऱ्हाड, साताऱ्यात उद्या लसीकरण बंद; जिल्‍हाधिकाऱ्यांनी केलं 'हे' आवाहन

ऑनलाइन अर्ज करावा लागणार

अनुदानासाठी रिक्षाचालकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध होणार असून, संबंधित ठिकाणी रिक्षाचालकांनी ऑनलाइन माहिती भरल्यानंतर त्याची तपासणी होणार आहे. ज्यांचे आधार क्रमांक बॅंक खात्याशी जुळतील, त्या परवानाधारकांच्या खात्यात ऑनलाइन रक्कम जमा होणार आहे.

रिक्षाचालकांची ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या लिंकमध्ये अचूक माहिती भरल्यानंतर खात्यावर रक्कम जमा होणार आहे. माहिती भरताना परवानाधारक रिक्षाचालकांना आधार कार्डचा नंबर आवश्‍यक असेल.

- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

काही सुखद बातम्या वाचा

satara-marathi-news-rto-appeals-autorickshaw-driver-fund-1500

loading image
go to top