

Satara municipal polls witnessed long queues and heavy rush till late night, with minor clashes reported at a few polling stations.
sakal
सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सर्वच केंद्रांवर मतदानासाठी मतदारांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभर मतदारांच्या ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा होत्या. दुपारी साडेचारपर्यंत सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी सरासरी ५८.६० इतके टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक पाच, १४ येथे दोन गटांमध्ये वादावादी, तर प्रभाग क्रमांक १८ मध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. या घटनानंतर शहरातील सर्वच मतदान केंद्रांवरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यासह जमलेल्यांना त्याठिकाणाहून पांगविण्यास सुरुवात झाली. सायंकाळी साडेपाच वाजता रांगेत असणाऱ्या मतदारांना प्रक्रियेत सहभागी करून घेत केंद्रे बंद करण्यात आली. अनेक केंद्रांत वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या. यामुळे येथील प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.