गोंदवल्यात संचारबंदी लागू; समाधी मंदिरासह आठवडा बाजार बंद

फिरोज तांबोळी
Wednesday, 13 January 2021

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाणवसा घेण्यासाठी महिला भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने उद्या सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

गोंदवले (जि. सातारा) : मकरसंक्रांतीच्या सणामुळे महिलांसह भाविकांची गर्दी टाळण्यासाठी उद्या (गुरुवारी) श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरासह गोंदवल्यातील सर्वच मंदिरे दर्शनासाठी बंद राहणार आहेत. उद्याचा आठवडा बाजारही बंद राहणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात नुकताच "श्रीं'चा पुण्यतिथी सोहळा साध्या पद्धतीने करण्यात आला. मुख्य दिवशी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. आता मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाणवसा घेण्यासाठी महिला भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने उद्या सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या काळात मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

भाविकांनाे! श्री यमाईदेवीच्या मंदिराचे दरवाजे तात्पुरते राहणार बंद  

गोंदवल्यातील मंदिर परिसरात संचारबंदी आदेश असल्याने येथील आठवडा बाजारही भरणार नसल्याचे प्रशासनाकडून आज उशिरा सांगण्यात आले. बाजार पटांगण परिसरातील मंदिरेही उद्या बंद राहणार असल्याचे मंदिर समितीने कळविले आहे. गेल्या आठवड्यात "श्रीं'च्या पुण्यतिथी महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमामुळे गुरुवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा हा बाजार बंद राहणार आहे. 

मायणीत सर्रास दुरंगी लढती; कलेढोणमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीत कॉंटे की टक्कर  

प्रशासनावर अतिरिक्त ताण 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना दमछाक झालेल्या प्रशासनाला सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. शुक्रवारी हे मतदान होत असून, उद्या मकरसंक्रांतीमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद ठेऊन लोकांची काळजी घेण्याचे कसब करावे लागणार असल्याने प्रशासनावर ताण आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Brahmachaitanya Maharaj Samadhi Temple Closed At Gondwale