esakal | दीड हजार बालकांची कोरोनावर मात; जिल्हा रुग्णालयात उत्तम उपचार

बोलून बातमी शोधा

Childrens
दीड हजार बालकांची कोरोनावर मात; जिल्हा रुग्णालयात उत्तम उपचार
sakal_logo
By
- प्रवीण जाधव

सातारा : कोरोनाबाधित प्रौढांच्या मृत्यूचा आकडा अडीच हजारांकडे गेला आहे. या स्थितीत जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नातून आत्तापर्यंत जिल्हा रुग्णालयात एक हजार 600 बालकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही आत्तापर्यंत रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या सुमारे 100 बालकांपैकी 99 बालकांना पूर्ण बरे करण्यात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंतच्या बाधितांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. सध्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग उच्च स्तरावर आहे. दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. एकाच दिवसात आज अडीच हजार जण बाधित निघाले आहेत. बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. आत्तापर्यंत दोन हजार 464 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले आहे. आठ दिवसांपासूनच्या बाळाचाही त्यात समावेश आहे. त्यातही लहान मुले अत्यवस्थ होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या साथीने या मुलांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

'दोन भावांच्या निधनानंतरही चार महिने कोरोनाशी लढले अन् अखेरच्या क्षणी जिंकले'

दुसऱ्या लाटेमधील लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे मुलांवर योग्य उपचार होण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांचा वॉर्ड हा कोविड बालकांसाठी राखीव करण्यात आला. त्यामध्ये ऑक्‍सिजनची सुविधाही करण्यात आली. कोरोनाची बाधा झाल्यापासून जिल्हा रुग्णालयात सुमारे दीड हजार बालकांवर कोरोनाचे उपचार करण्यात आले. जानेवारीपासून जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत एकूण 600 बालके उपचारासाठी दाखल झाली. त्यातील बहुतांश मुलांना बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. योग्य उपचारांमुळे ही मुले घरीच ठणठणीत बरी झाली. दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेमुळे आजार बळावलेल्या 100 मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये पाच, आठ, 16 दिवसांच्या बालकांचाही समावेश होता. त्यामध्ये तापामुळे फिट आलेल्या तीन मुलांचाही समावेश होता. फिट आलेल्या एका बालकाशिवाय इतर सर्व मुलांना वाचविण्यात बालरोग तज्ज्ञांना यश आले आहे.

मुलांना का होतोय कोरोना?

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात पालक मुलांची जास्त काळजी घेत होते. त्यामुळे त्या वेळी लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, आता तितक्‍या गांभीर्याने काळजी घेतली जात असल्याचे दिसत नाही. मुलांना खेळायला सोडले जायचे, दुकानातून वस्तू आणायला पाठविण्यात यायचे, असे काही रुग्णांच्या माहितीतून पुढे आले आहे. मुलांचे एक्‍सापेजर वाढलेले असल्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचे जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अरुंधती कदम यांनी सांगितले. सर्दी, ताप, जुलाब किंवा अंगावर रॅश उठत असल्यास पालकांनी तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन मुलांची कोरोना टेस्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

फ्लॅट/प्लॉट घेताना कोणती काळजी घ्याल? खरेदी करताना 'या' गोष्टी तपासाच!

...अशी घ्या काळजी

मुलांना घराबाहेर पाठवू नये

खेळाची घरातच व्यवस्था करावी

बाहेर जाणाऱ्यांनी मुलांच्या कमीत कमी संपर्कात यावे

लहान बाळांना बाहेरून येणाऱ्यांकडे देऊ नये

लहान बाळांना हाताळताना आईने हात निर्जंतुक करावेत तसेच मास्कचा वापर करावा

वडूज पंचायतीची शववाहिका ठरतेय 'वरदान'; खटावातील तब्बल 180 मृतांची केलीय ने-आण

Edited By : Siddharth Latkar