पाटणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेला 'दुय्यम' वागणूक; आर्थिक भुर्दंडाचा सोसावा लागतोय भार

पाटणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेला 'दुय्यम' वागणूक; आर्थिक भुर्दंडाचा सोसावा लागतोय भार

पाटण (जि. सातारा) : शासकीय कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करूनही पाटणचे दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज दुपारी 12 वाजल्यानंतर सुरू होते. कार्यालयप्रमुख दररोज उशिरा येत असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारासाठी आलेल्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडाचा भार सहन करावा लागत आहे. नेहमीच्या या "लेटलतीफ' कारभारावर वरिष्ठ कार्यालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

कर्मचाऱ्यांना सहा दिवसांचा आठवडा कमी करून राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला. कामकाजाचे तास वाढविले. मात्र, या वाढलेल्या तासाबरोबर इतर वेळीही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वाया जात आहे. अशा अजब कारभाराचा उत्तम नमुना म्हणजे पाटण दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रमुख दुय्यम निबंधक हे दुपारी 12 वाजल्यानंतर येत असल्याने या कार्यालयात आलेल्या जनतेला हेलपाटे मारावे लागत आहेत. कधी सर्व्हर डाउन, कधी ऑनलाइन संपर्क क्षेत्राच्या बाहेर, कधी संगणक चालत नाही अशा अनेक कारणांनी या कार्यालयात आलेली जनता दिवसभर ताटकळत उभी राहते. 

त्यातच दुय्यम निबंधक एखाद्या दिवसाचा अपवाद सोडला तर कायम उशिरा येतात. त्यादिवशीचे दस्त पुढील दिवसावर जातात. तालुक्‍याच्या दुर्गम भागातून आलेली जनता परतीचा प्रवास सुरू करतात, तेव्हा गावापर्यंत गाडी मिळेल का, या विवंचनेत राहतात. दुसऱ्या दिवशी लवकर यावे तर साहेब नेहमीप्रमाणे येतात. अधिकारी आलेत परंतु सर्व्हर डाउन, नेटवर्क संपर्काबाहेर. पुन्हा घरचा रस्ता धरायचा आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आले तरी पुन्हा मागचा पाढा सुरू होतो. वरिष्ठ कार्यालयाने एक वेळ झाडाझडती घेतल्याशिवाय या कारभारत सुधारणा होणार नाही. दलालांचे दस्त नियमाप्रमाणे न घेता नियम मोडून मध्येच घ्यायचे, दिवसभर दलाल कार्यालयात बसून असल्याचेही चित्र पाहावयास मिळते. सामान्याला नियम आणि थोरा-मोठ्यांना अभय, हा प्रकार असल्याने सामान्य जनता त्रस्त आहे. 

कोरोना उपाययोजनांचे नियमही पायदळी 
कार्यालय प्रमुख उशिरा येत असल्याने लोकांची गर्दी कायम कार्यालयाच्या दरवाजात दिसते. कोरोनासाठीचे नियमही या लेटलतीफ कारभारामुळे पायदळी तुडविले जात आहेत. बामणेवाडी किंवा निवी-कसणीचा नागरिक या कार्यालयात आला आणि या कार्यपद्धतीमुळे उशीर झाला तर त्याने घर कसे गाठायचे, असा प्रश्‍न त्याच्यासमोर उभा राहतो. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com