धुके, ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्‍यात; खटाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुके, ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्‍यात; खटाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत

खटाव तालुक्यात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व सकाळच्या दाट धुक्‍यामुळे कांदा व बटाटा पिकावर विपरित परिणाम होत आहे.

धुके, ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्‍यात; खटाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुका उत्तर भागात गत दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन तयार होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे व सकाळच्या दाट धुक्‍यामुळे कांदा, बटाटा, आले आदी नगदी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, उत्पन्नात घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. 

यंदा या भागात सर्वत्र कांदा व बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मागील आठवड्यापासून हवामानात सतत बदल होऊन थंडीचे प्रमाण कमी जास्त होत आहे. तर गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व सकाळच्या दाट धुक्‍यामुळे कांदा व बटाटा पिकावर विपरित परिणाम होत आहे. कांद्यावर मावा, तुडतुडे व रस शोषणाऱ्या किडींचा तसेच करपा व आकडी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बटाट्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाडांनी माना टाकल्या आहेत. हे वातावरण आणखी काही दिवस असेच राहिले तर कांदा व बटाट्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्‍यता दिसून येत आहे. 

Wow Its So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद

डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढल्याने नगदी पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत होते. पिके चांगली वाढून खरीप हंगामाची नुकसानभरपाई वसूल होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, वातावरणातील बदल नुकसानाची चाहूल घेऊन आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी निराश होत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

टॅग्स :Satara