अवघ्या चार भूखंडांच्या विक्रीतून ढेबेवाडी पंचायतीने मिळवला 37 लाखांचा महसूल

राजेश पाटील
Friday, 19 February 2021

सध्या ढेबेवाडीचे होत असलेले शहरीकरण आणि वाढता विकास यामुळे जागांचे दर गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : येथील वाढीव गावठाणात अनेक वर्षांपासून शिल्लक असलेल्या भूखंडांची महसूल प्रशासनाकडून लिलावाने विक्री करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या लिलावात बोलीसाठी मोठीच चढाओढ दिसून आली. अवघ्या चार भूखंडांच्या विक्रीतूनच 37 लाख 20 हजार रुपयांचा महसूल मिळाला. 

ढेबेवाडीसाठी सुमारे 40 वर्षांपूर्वी वाढीव गावठाण विकसित करण्यात आले आहे. त्यातील शिल्लक सहा भूखंडांच्या लिलावासाठी स्थानिक महसूल यंत्रणेकडून वरिष्ठांना कळविण्यात आल्यानंतर लिलावाव्दारे त्याच्या विक्रीची प्रक्रिया महसूल विभागाने हाती घेतली. तत्पूर्वी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात नुकत्याच झालेल्या लिलाव प्रक्रियेत 29 जणांनी भाग घेतला. 

हे पण वाचा- झऱ्यांच्या पाण्यासाठी अश्रूंचे झरे! पोलिस व महसूल प्रशासनाला फुटेना पाझर

तहसीलदार श्री. टोंपे, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, सचिन थोरात, अर्जुन पाटील, संजय काशीद, धनंजय डोंगरे, विशाल कांबळे, हणमंत सकट आदी महसूल कर्मचारी व भूखंडासाठी इच्छुक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सहापैकी चार भूखंडांसाठी बोली लावण्यात आली. चढाओढीमुळे निर्धारित आकड्यापेक्षा बोली किती तरी जास्त पुढे सरकली. चार भूखंडांच्या विक्रीतूनच 37 लाख 20 हजार रुपयांचा महसूल मिळाल्याचे मंडलाधिकारी श्री. शिंदे यांनी सांगितले. सध्या ढेबेवाडीचे होत असलेले शहरीकरण आणि वाढता विकास यामुळे जागांचे दर गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Dhebewadi Gram Panchayat Earned Revenue of 37 Lakhs By Selling Four Plots