
खटाव तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींमधील 558 जागांसाठी एक हजार 194 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत युवा उमेदवारांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे. तर काही ठिकाणी गावातील ज्येष्ठ उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसत आहे.
वडूज (जि. सातारा) : सद्या अनेक ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा प्रचार चांगलाच जोशात आला आहे. खटाव तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, त्यामध्ये बहुतांशी उमेदवारांनी सोशल मीडियाचा कसबीने वापर केल्याचे दिसत आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांच्या प्रचाराच्या ध्वनिफिती मतदारांच्या मोबाईलवर फिरताना दिसत आहेत.
तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींमधील 558 जागांसाठी एक हजार 194 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत युवा उमेदवारांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे. तर काही ठिकाणी गावातील ज्येष्ठ उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांत कोरोना संसर्गामुळे थंड असलेले वातावरण निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार सद्या चांगलाच रंगात आला आहे. मतदारांच्या गाठीभेटी, आपापल्या गावांतील वॉर्डामध्ये पदयात्रा यांवर उमेदवारांचा भर दिसून येत आहे. आपापल्या वॉर्डातील गल्लीबोळांत फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. बदलत्या परिस्थिती व आधुनिक प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा कसबीने वापर केल्याचे आढळून येत आहे.
भाजप-राष्ट्रवादीच्या आघाडीची शिवसेनेशी टक्कर; तारळ्यात कडव्या झुंजीचे संकेत
डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एक मिनिटापासून ते पाच मिनिटांपर्यंतच्या दृक्श्राव्य माध्यमातील ध्वनिचित्रफितींचा वापर या निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे. मोबाईल व एडिटींगचे चांगले ज्ञान असणारे काही युवक अशा ध्वनिचित्रफिती मोबाईलवरच करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापल्या गावात, वॉर्डात तसेच विविध ग्रुपच्या माध्यमातून दूरपर्यंत उमेदवारांना प्रचारासाठी पोचणे सुलभ झाले आहे. डिजिटल मीडियाचा वापर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय यू ट्यूबवरदेखील अशा ध्वनिचित्रफिती कशा बनवाव्यात, यापासून ते ध्वनिचित्रफिती बनवून देणाऱ्यांच्या जाहिराती झळकत आहेत. त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीत डिजिटल मीडियाचाच वापर अधिक झाल्याचे दिसून येत आहे.
Gram Panchayat Election : पुस्तकांच्या गावात राष्ट्रवादीसमोर भाजप-सेनेचे तगडे आव्हान
गाणी व मथळे तेच, मात्र उमेदवार वेगळा...
दृक्श्राव्य माध्यमातील ध्वनिचित्रफिती बनविताना कार्यकर्त्यांत जोश संचारेल व मतदारांना भुरळ पडेल, अशा गाण्यांचा व मथळ्यांचा वापर होत आहे. यामध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ बहुतांशी ठिकाणी तीच गाणी व तेच मथळे दिसत असले तरी गावोगावी उमेदवारांचा चेहरा मात्र नवा दिसत आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे