सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र, त्याचा संयमाने वापर व्हावा : डॉ. दाभोलकर

दिलीपकुमार चिंचकर
Saturday, 6 February 2021

दारू, गांजा, तंबाखू याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर हेही आता एक व्यसन झाल्याचे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

सातारा : सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून, त्याचा वापर संयमाने आणि विवेकाने केला पाहिजे. रॅगिंग ही एक प्रवृत्ती आहे. ती कॉलेजमध्येच नाही तर जीवनात सर्वत्र आढळून येते. सोशल मीडिया अशा प्रवृत्तीला बळ देते. कारण, हे माध्यम सहज उपलब्ध होते, असे मत डॉ. हमीद दाभोलकर (Dr. Hamid Dabholkar) यांनी व्यक्त केले. 

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अँटीरॅगिंग समिती आणि महिला विकास मंच यांच्या संयुक्तपणे डॉ. दाभोलकर यांचे "सोशल मीडिया आणि युवकांची मानसिकता' या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ. अनिसा मुजावर होत्या. डॉ. दाभोलकर यांनी रॅगिंग ही संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले, "दारू, गांजा, तंबाखू याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर हेही आता एक व्यसन झाले आहे. भारतीय समाजात आज सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याचा परिणाम म्हणून महिलांचे शोषण वाढले आहे. नातेसंबंधांमध्ये गुंतागुंत वाढली आहे. 

प्रतापगड, अजिंक्‍यतारा किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा; उदयनराजेंची उपराष्ट्रपतींकडे मागणी

आभासी वास्तवात जगण्याची प्रवृत्ती वाढली आहे. व्यक्तीचे मनस्वास्थ्य धोक्‍यात आले आहे. एकाग्रता कमी होणे, एकाकीपणा वाढणे, नैराश्‍य आदी समस्या निर्माण झाल्या आहेत आणि परिणामतः आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. म्हणून सोशल मीडियाच्या वापरावर आपले नियंत्रण असले पाहिजे.'' डॉ. अनिसा म्हणाल्या, ""तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगामुळे समाजामध्ये प्रेम, सहानुभूती या मूल्यांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर व्यक्तिमत्त्व विकासासाठी करावा.'' अँटीरॅगिंग समितीच्या प्रमुख डॉ. मानसी लाटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रुक्‍साना पठाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. के. एल. पवार यांनी आभार मानले. या वेळी डॉ. अनिल वावरे, डॉ. कांचन नलवडे, डॉ. सुरेश झोडगे, डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. अभिमान निमसे व डॉ. सुधाकर कोळी उपस्थित होते. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Dr. Hamid Dabholkar Appeal To Avoid Excessive Use Of Social Media