परदेशी पाहुण्यांना मायणी तलावाचा विसर; फ्लेमिंगोंची अद्याप गैरहजेरी

संजय जगताप
Saturday, 13 February 2021

ब्रिटिशकालीन मायणी तलावासह परिसरात फ्लेमिंगोसह विविध परदेशी पाहुणे पक्षी न चुकता प्रतिवर्षी डेरेदाखल होत असतात.

मायणी (जि. सातारा) : हिवाळा संपत आला तरी फ्लेमिंगो हे परदेशी पाहुणे पक्षी अद्याप मायणी तलाव वा परिसरातील छोट्या-मोठ्या पाणवठ्यावर दाखल झाले नाहीत. त्यामुळे यंदा ऐतिहासिक मायणी तलावाचा त्यांना विसर पडला की काय? अशी प्रतिक्रिया अस्वस्थ पक्षीनिरीक्षक व्यक्त करीत आहेत. 

ब्रिटिशकालीन मायणी तलावासह परिसरात फ्लेमिंगोसह विविध परदेशी पाहुणे पक्षी न चुकता प्रतिवर्षी डेरेदाखल होत असत. दिवाळीदरम्यान कडाक्‍याच्या थंडीच्या कालावधीत दाखल होऊन सुमारे अडीच-तीन महिने तलाव परिसरात वास्तव्य करीत असत. त्यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातून अनेक छंदिष्ट पक्षीप्रेमी तेथे भेट देत असत. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या फ्लेमिंगोंच्या दर्शनासाठी तासन्‌ तास ते व्यतित करीत असत. त्याची दखल घेत तलाव परिसरात पक्षीनिरीक्षक व पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यात आल्या. 

JEE MAIN परीक्षा देताय?, मग आधी ही मार्गदर्शक तत्त्वे वाचा; म्हणजे, तुम्हाला सहज प्रवेश मिळेल!

पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळानेही फ्लेमिंगोंची गांभीर्याने दखल घेत इयत्ता नववीच्या इंग्रजी पुस्तकात मायणी तलावात मुक्तविहार करणाऱ्या फ्लेमिंगोंचे छायाचित्र (मायग्रेशन ऑफ बर्डस) प्रसिध्द केले. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यात स्वागत कमान, पर्यटक निवास, बाग, कुंपण, पक्षीनिरीक्षण मनोरे, दुर्बिणी आदी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. 

दरम्यान, पक्ष्यांच्या वास्तव्याची अनेक वर्षांची परंपरा ध्यानात घेऊन मायणी तलावासह सूर्याचीवाडी व येरळवाडी परिसर राज्य शासनाने वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केले. मात्र, दैनिक "सकाळ'कडील नोंदीनुसार 2003 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळापासून आतापर्यंत दाखल होणाऱ्या फ्लेमिंगोंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. यंदा तर एकही फ्लेमिंगो पक्षी या परिसरात दाखल झालेला नाही. परिसरातील सर्व तलावांत मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, आता हिवाळा संपत आला तरीही फ्लेमिंगोचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे स्थानिक पक्षीनिरीक्षक व नागरिकही अस्वस्थ झाले आहेत. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील पक्षीनिरीक्षक स्थानिकांना संपर्क साधून फ्लेमिंगोंबाबत चौकशी करीत आहेत. मायणी तलावाचा फ्लेमिंगोंना विसर पडला की काय?, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. 

पुणे-बंगळूर महामार्गावर दोन महिन्यांत तब्बल 80 अपघात; मुंबई, गोव्याची वाहने सुसाट

स्थानिक पक्षी पाहून दुधाची तहान ताकावर 

फ्लेमिंगोऐवजी सध्या तलाव परिसरात विविध जातींचे बगळे, बदके, कापशी घार, दलदल ससाणा असे शिकारी पक्षी तसेच नदीसूर, खंड्या, कवड्या, राखी बगळा, वंचक, चित्रबलाक आदी स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचा किलकिलाट ऐकायला मिळत आहे. त्यामुळे फ्लेमिंगो येणार की स्थानिक पक्षी पाहून दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार, असा नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Flamingo Bird Did Not Come To The Mayani Lake Area