एकत्रिकरणातून काँग्रेस बाजूला आता राष्ट्रवादीकडे नजरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

एकत्रिकरणातून काँग्रेस बाजूला आता राष्ट्रवादीकडे नजरा!

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात (krishna sugar factory) दोन्ही मोहित्यांचे एकत्रिकरणाच्या प्रक्रियेतून आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी एक्झिट घेतली आहे. त्यामुळे मोहित्यांच्या एकत्रिकरणातून काँग्रेस (congress) बाजूला झाल्याचे दिसते. आता या एकत्रिकरणात राष्ट्रवादीची (nationalist congress party) भूमिका काय राहणार, याकडे कृष्णाकाठचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार हे या मनोमिलनावर काय भूमिका घेणार, त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. (satara-news-krishna-sugar-factory-election-2021-sharad-pawar-decision-indrajeet-mohite-avinash-mohite-unity)

राज्य सरकारमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसने कृष्णा कारखान्यात समविचारी भूमिका घेण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी मुंबईला दोन, सातारा व नंतर कऱ्हाडला बैठकांचे सत्र सुरू होते. डॉ. मोहिते, अविनाश मोहिते यांच्यातील सवतासुभा संपविण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी काँग्रेस नेत्यांनी दोन वेळा कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर हे सातत्याने बैठका घेऊन दोन्ही मोहित्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत होते. दिवस-रात्र चर्चेच्या झालेल्या फेऱ्यांची उत्सुकता असतानाच अखेर रविवारी रात्रीपर्यंत एकमत झाले नाही.

त्यानंतर सोमवारी आमदार चव्हाण यांनी एकत्रिकरणाच्या चर्चेतून बाहेर पडत आहे, असे जाहीर केले. त्याचवेळी एकत्रीकरणाची प्रक्रिया थांबली आहे, असे म्हणता येणार नाही, अशी आमदार चव्हाण यांनी घेतलेली स्पष्ट भूमिकाही बरेच काही सांगून जाते. त्यामुळे त्यांची भूमिका ही दोन्ही मोहित्यांच्या एकत्रीकरणाला स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही, असे जाणकारांचे मत आहे.

राष्ट्रवादीकडून एकत्रिकरणाची चर्चा केवळ अविनाश मोहितेच करत होते, असे आत्तापर्यंत दिसत आहे. सांगली, सातारा जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्यापही त्यात काहीही भूमिका किंवा मत व्यक्त करत नाहीत. मात्र, जलसपंदामंत्री जयंत पाटील व सहकामंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटांच्या हालचाली राष्ट्रवादीलाच पोषक आहेत. सांगलीचे पालकमंत्री म्हणून पाटील यांची परवाच डॉ. इंद्रजित मोहिते व डॉ. सविता मोहिते यांनी भेट घेतली. त्या हालचाली बेदखल कराव्यात, अशा नि‍श्‍‍चीत नाहीत.

Jayant patil & savita mohite

Jayant patil & savita mohite

कृष्णाचे क्रियाशील, अक्रियाशील सभासदांच्या निर्णयात पालकमंत्री पाटील यांनी सहकारमंत्री म्हणून दिलेला निर्णयही पक्ष बळकटीचा ठरत आहे. अविनाश मोहिते यांनी बहुतांशी बैठकांमध्ये राष्ट्रवादी ठामपणे सोबत आहे, असे जाहीर केले आहे. मात्र, दोन्ही मोहित्यांच्या एकत्रीकरणावर राष्ट्रवादीतून अद्यापही काहीही मत व्यक्त झालेले नाही. राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यातही ज्येष्ठ नेते शरद पवार काय निर्णय देणार, त्यावरही राजकीय हालचाली अवलंबून आहेत. त्यांनीही अद्याप निर्णय दिलेला नाही.

मोहिते यांनी ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला शरद पवार हे रेठऱ्यात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी त्याही कार्यक्रमातून वेळ काढून अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यामुळे त्यांचा दोन्ही मोहित्यांशी असलेला घरोबाही ‘कृष्णा’च्या राजकारणात महत्त्वाचा ठरू शकतो.

उंडाळकर गट सायलेंट

ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांना मानणारा गट कृष्णा कारखान्यात नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. मोहिते, भोसले गटांसह अविनाश मोहिते गटासही त्याचा अनुभव आहे. मात्र, ज्येष्ठ नेते उंडाळकर यांच्या पश्चात ‘कृष्णा’ची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे उंडाळकर गट अद्यापही सायलेंट आहे. गटाचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे एकत्रिकरणाच्या प्रक्रियेत सक्रिय होते. एकत्रिकरणाविषयी अॅड. उंडाळकर यांनी यथावकाश भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे.

काही सुखद बातम्या वाचा

टॅग्स :Sharad PawarSatara