धनगरवस्तीत बिबट्याने झडप घालून बैलाला केले ठार; नागरिकांत भीतीचे वातावरण

भद्रेश भाटे
Saturday, 20 February 2021

धनगरवस्ती (जोर) हा वाईच्या पश्‍चिम भागातील दुर्गम भाग असून, या परिसरात घनदाट जंगल आहे.

वाई (जि. सातारा) : धनगरवस्ती (जोर, ता. वाई) येथील एका बैलावर बिबट्याने झडप घालून ठार मारले. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे गणेश पाकू ढेबे यांचे अंदाजे 40 हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिस पाटील यांनी वन विभागात दिली. 

वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, धनगरवस्ती (जोर) हा वाईच्या पश्‍चिम भागातील दुर्गम भाग असून, या परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक रानटी हिंस्त्र प्राणी राहत असून, या भागात बिबट्याचाही वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले आहे. बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने कोणालाही कळायच्या आतमध्ये बिबट्याने आपला डाव साधून बैलाचा जीव घेतला. ग्रामस्थांनी आरडा-ओरडा केल्यानंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली. परंतु, गरीब शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

हे पण वाचा- फळबाग लागवडीत खटाव तालुका आघाडीवर; महात्मा गांधी रोजगार हमीचे उद्दिष्ट पूर्ण!

वन विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून 40 हजार देण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी सांगितले. या परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने अनेकांच्या दावणीला शेळी, मेंढी, म्हैस, गाय व बैल अशी जनावरे पाळलेली आहेत. त्यांच्या निघणाऱ्या दुधावर लोकांचा उदरनिर्वाह चालू असतो. त्यांचे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही. भात पीक आणि पाळीव जनावरे हाच मुख्य व्यवसाय असल्याने बिबट्याच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तसेच नागरिकांचाही जीव टांगणीला लागलेला आहे. 

हे ही वाचा- पाटणात नुकसान भरपाईपासून दहा हजार शेतकरी वंचित; सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार

जांभळीपासून त्या परिसरातील जंगली भागात बिबट्यासह काही जंगली हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य आहे. तरी परिसरातील नागरिकांनी आपल्या पाळीव जनावरांसह स्वतःचे रक्षण करावे. त्यातूनही नुकसान झाल्यास वन विभागाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे त्वरित नुकसान भरपाई देण्यात येईल.'' 

-महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल, वन विभाग वाई  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Leopard Attacks Bull In Jor Village