
गतवर्षी पाटण तालुक्यात अतिवृष्टीने भात, सोयाबीन, भुईमुग, हायब्रीड, नाचणी या पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला.
मल्हारपेठ (जि. सातारा) : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीतील पिकांच्या नुकसान भरपाईपासून दहा हजार शेतकरी वंचित आहेत. शासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. दिवाळीच्या काळात 5,228 शेतकऱ्यांना एक कोटी 2 लाखांचे वाटप झाले. तालुक्यातील 15,720 शेतकरी नुकसानग्रस्त आहेत. गुंठ्याला 100 रुपये नुकसान भरपाई म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
गतवर्षी पाटण तालुक्यात अतिवृष्टीते भात, सोयाबीन, भुईमुग, हायब्रीड, नाचणी या पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. 2019 मध्ये झालेल्या पूरपरिस्थिती आणि अवकाळीनेही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. शासकीय स्तरावरून पीक नुकसानीचे पंचनामे झाले. परिस्थितीची पाहणी करून नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहिले, तर गतवर्षीही झालेल्या अतिवृष्टीचे थेट बांधावरून पीक नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र, त्यात भात, नाचणी पिकांसाठी नुकसान भरपाईची अट घालण्यात आली. त्यामुळे भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊनही भरपाईत डावलले गेले. सलग दोन वर्षे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे चिंता वाढली आहे.
झऱ्यांच्या पाण्यासाठी अश्रूंचे झरे! पोलिस व महसूल प्रशासनाला फुटेना पाझर
दरम्यान, राज्य शासनाने 13 फेब्रुवारी 2005 च्या शासन निर्णयानुसार जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी 6,800 रुपये, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 13,500 रुपये नुकसान भरपाई देण्याचा निकष आहे. तरीही महाविकास आघाडीच्या सरकारने सरसकट हेक्टरी 10 हजारांची भरपाई देण्याचे निश्चित केले. नुकसान झालेल्या क्षेत्रातील 33 टक्केच नुकसान भरपाई ग्राह्य धरून प्रति गुंठा 100 रुपये मिळणार आहेत. अतिवृष्टीने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, ऊस आणि कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, भात, नाचणी पिकांचा पंचनाम्यात समावेश ग्राह्य धरला गेला आहे. त्यामुळे अन्य पिकांची नुकसान भरपाई मिळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्नी आवाज उठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
हे पण वाचा- पुस्तके ही माणसाला विचार देतात; माणसांच्या जीवनाला दिशा देतात
अतिवृष्टीतील नुकसान भरपाईची उर्वरित शेतकऱ्यांची पात्र यादी दोन दिवसांत जाहीर होऊन भरपाई रक्कम खात्यावर वर्ग होणार आहे. उर्वरित 4 हजार 104 शेतकऱ्यांसाठी अहवाल पाठवला आहे. रक्कम मंजूर होताच या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल.
प्रशांत थोरात, नायब तहसीलदार, पाटण
हे ही वाचा- जय शिवराय! सुर्वेंची तिसरी पिढी जपतेय मर्दानी खेळांची परंपरा
भात, नाचणी सोडून इतर पिकांचे 100 टक्के नुकसान होऊनही नुकसान भरपाई नाही, तर मग पंचनामे कशाला केले? शासनाने यावर काय तरी तोडगा काढला पाहिजे.
गणेश कदम, शेतकरी, गणेवाडी
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे