कोरेगावात पाण्याच्या फुगवट्याने रस्ता बंद; तालुक्‍यातील 125 शेतकऱ्यांची अडचण

साहेबराव होळ
Wednesday, 27 January 2021

किन्हई व पेठ किन्हईच्या मध्यातून वांगणा नदी वाहते. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने पिके वाळून गेली आहेत.

गोडोली (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्‍यातील किन्हई येथील वांगणा नदीवर शासनाच्या पाणी अडवा, पाणी जिरवा व मृद संधारण विभागाकडून कोल्हापूर पद्धतीचे सिमेंटचे पक्के बंधारे झाले. मागील पावसाळ्यात सगळे बंधारे तुडुंब भरून वाहू लागले. मात्र, गावाजवळील महादेवाच्या मंदिराजवळील बंधाऱ्याने शेतकऱ्यांना शिवारात जाण्यासाठी असणारा जुना वहिवाटीचा रस्ता बंद झाल्याने सुमारे 125 शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे व शेतमाल बाहेर काढणे अडचणीचे झाले आहे. 

किन्हई व पेठ किन्हईच्या मध्यातून वांगणा नदी वाहते. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने पिके वाळून गेली. पाणीटंचाई लक्षात घेऊन बबनराव भोसले यांच्या शेताजवळील ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढला. महादेवाचे देऊळ व मध्वापूरवाडीजवळ तसेच स्मशानभूमीजवळ केटी बंधारे बांधले गेले. मात्र, गावाजवळील बंधाऱ्यांच्या बांधकामाचे वेळी पाण्याने रस्ता बंद होईल, याची दक्षता घेतली नाही. 

दक्षिण मांड नदीवरील 50 वर्षांपूर्वीचा पूल इतिहास जमा; नवीन पुलासाठी सरकारचा प्रयत्न

सध्या या बंधाऱ्याच्या पाण्याच्या फुगवट्याने शेतात जाणारा वाहतुकीचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. सध्या उसाची तोडणी चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वाहतुकीसाठी तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. या कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी पूल रस्ता करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Loss Of 125 Farmers In Koregaon Taluka