ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करा : रामराजे

उमेश बांबरे
Wednesday, 21 October 2020

विकास सेवा संस्थांनी यापुढे पारंपरिक व्याजावर अवलंबून राहून व्यवसाय करण्यापेक्षा उत्पन्नाचे अन्य स्त्रोत शोधावेत, यासाठी नाबार्डकडून सर्व ते सहकार्य उपलब्ध होईल, असे आश्वासन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.

सातारा : स्पर्धात्मक युगात फक्त शेतीपूरक व्यवसायच नव्हे, तर शेती सोडून अन्य व्यवसायही सुरू करून संस्थेचे उत्पन्न वाढवून त्या सक्षम कराव्यात. या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करावी. यासाठी जिल्हा बॅंक सर्वतोपरी मदत करेल, असा विश्‍वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
 
जिल्हा बॅंक, राज्य सहकारी बॅंक व नाबार्ड यांच्या वतीने विकास सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिव यांच्या सभेचे आयोजन केले होते. या वेळी विकास सोसायट्यांचे बहुउद्देशीय सेवा केंद्र म्हणून परिवर्तन करण्याच्या योजनेचा प्रारंभ झाला. त्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात बॅंक संलग्न 10 विकास सेवा सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिव यांची उपस्थिती होती. या वेळी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संचालक राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभासदांची दिवाळी होणार गोड; मंत्रिमंडळाचा निर्णय 

सुनील माने म्हणाले, जिल्ह्यातील सर्व विकास संस्था संगणकीकृत करण्याचा बॅंकेचा मानस आहे. विकास संस्थांनी मानसिकता बदलावी. भविष्यात काहीही होऊ शकते. आर्थिक अडचणी येऊ शकतात. यासाठी आपण सक्षम असले पाहिजे. डॉ. सरकाळे यांनी नाबार्डची योजना, विकास सेवा सोसायट्यांचे बहुउद्देशीय सेवा केंद्र सुरू करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक अभ्यंकर यांचे मार्गदर्शन झाले. राजेंद्र भिलारे यांनी प्रास्ताविक केले. शेती कर्ज विभागाचे उपव्यवस्थापक भंडारे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Meeting Of Development Service Societies At Satara