
जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत वार्षिक योजनेसाठी 140 कोटींचा वाढीव निधी मागणीची शिफारस करण्यात आली आहे.
सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 140 कोटींचा वाढीव निधी मागणीची शिफारस करण्यात आली आहे, तसेच ज्या कामांना वाढीव निधी लागणार आहे, अशांना तो देण्यात यावा, अशी सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील व अर्थ, नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, तर अर्थ व नियोजन राज्यमंत्री देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झाली. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Breaking News : उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाच निर्वाळा
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. जगदाळे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे सन 2021-2022 प्रारूप आराखड्यातील आलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. 2021-22 च्या प्रारूप आराखड्यातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 140 कोटी वाढीव मागणीसह 404.75 कोटींच्या प्रस्तावास, अनुसूचित जाती उपयोजनेच्या 79.83 कोटींच्या प्रस्तावास, तर आदिवासी उपयोजनेसाठी 1.58 कोटी प्रस्तावाला समितीची शिफारस करण्यात आली. एकूण जिल्ह्यासाठी 486.16 कोटींची मागणी करण्यात आली आहे. ज्या महत्त्वांच्या कामांना जास्तीचा निधी लागणार आहे, अशा कामांना वाढीव निधी देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील व अर्थ, नियोजनमंत्री श्री. देसाई यांनी केली.
सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना
संपादन : बाळकृष्ण मधाळे