मोदीजी, 70 वर्षांत कॉंग्रेसनं काहीच नाही केलं; मग तुम्ही 7 वर्षांत काय केलं?; माजी मुख्यमंत्र्यांचा टोला

संजय साळुंखे
Saturday, 20 February 2021

केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल, डिझेल महाग मिळत असल्याचा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

सातारा : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ होत चालली आहे. आपला नाकर्तेपण लपविण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यात केंद्र सरकार धन्यता मानत आहे. गेल्या सरकारांनी कमीतकमी देशातंर्गत तेल प्रकल्प तरी उभारले. तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा, अशी टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. 

जिल्हा कॉंग्रेस समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे देण्याबरोबरच आयोजित सत्कार समारंभासाठी ते येथे आले होते. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर, विराज शिंदे आदी उपस्थित होते. दरवाढीबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. चव्हाण म्हणाले, ""देशाच्या मागणीच्या तुलनेत 85 टक्के तेल आयात करावे लागत आहे. या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्‍चित होते. चुकीच्या कररचनेमुळे आणि केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल, डिझेल महाग मिळत आहे. आधीच्या सरकारांनी देशातील साठ्यांचा शोध घेत तेल प्रकल्प उभारले आहेत. तुम्ही सात वर्षांत कोणते प्रकल्प उभारले ते जाहीर सांगावे.'' कोरोना काळातील मदतीचे फुगीर आकडे सांगत सर्वसामान्यांना लुटायचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

हे पण वाचा- लोकशाहीचे नव्हे, तर हे ठोकशाहीचे राज्य; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

विविध कारणांवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्याच्या प्रश्‍नावर श्री. चव्हाण यांनी विरोधकांचे कामच टीका करणे असते, असे वक्‍तव्य करत राज्यात सुरू असलेल्या अवकाळीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठीचा विषय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगितले. जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत आमची अंतर्गत चर्चा सुरू असून, त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या धोरणानुसारच महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा- कऱ्हाडातील 104 ग्रामपंचायतींचे मंगळवार, बुधवारी ठरणार नवे कारभारी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीबाबत कॉंग्रेसअंतर्गत चर्चा सुरू असून, त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. 
-पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News MLA Prithviraj Chavan Criticizes Modi Government Over Fuel Price Hike