खातगुणच्या ब्रिटिशकालीन धरणाचे होणार पुनरुज्जीवन; शरद पवारांची जलसंपदा मंत्र्यांकडे शिफारस

ऋषिकेश पवार
Tuesday, 9 February 2021

ब्रिटीश कंपनीने 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबर पत्रव्यवहार करुन धरणाची मुदत संपली असल्यामुळे तातडीने दुरुस्ती करावी, अशी सूचना केली होती.

विसापूर (जि. सातारा) : येरळा नदी आणि राम ओढ्याच्या संगमावरील खातगुण (ता. खटाव) येथील ब्रिटिशकालीन 'गज' धरणाचे पुनरुज्जीवन करण्याची शिफारस खासदार शरद पवार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. खातगुणच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने या कामासाठी खासदार पवार यांची बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली. 

शिष्टमंडळाने खासदार पवारांना विविध कामांचे निवेदनही सादर केले. पवारांनी धरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडून तातडीने पुनरुज्जीवन कामासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. लवकरच जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांसमवेत लोकप्रतिनिधी आणि गावकर्‍यांची बैठक मंत्रालयामध्ये होणार असून धरणाच्या कामाला गती मिळेल, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्या अमिना सय्यद यांनी दिली.

शरद पवारांनी किती फडांवर जावून कुस्त्या खेळल्या, हेही सांगावं

खातगुणच्या 'गज' धरणाचे बांधकाम दिडशे वर्षांपूर्वी 1867 साली झाले होते. धरणाचे पूर्ण बांधकाम दगडी असून लांबी 300 मीटर, रुंदी 7 फुट आणि उंची 30 फुट आहे. धरणाला दोन कालवे आहेत. उजवा कालवा 25 कि.मी. तर डावा कालवा 14 कि.मी. लांबीचा आहे. धरणाच्या पाण्यावर सुमारे 1700 हेक्टर जमीन ओलिताखाली असून दुष्काळी भागासाठी हे धरण संजीवनी आहे. ब्रिटीश कंपनीने 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबर पत्रव्यवहार करुन धरणाची मुदत संपली असल्यामुळे तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी, अशी सुचना केली होती. त्यानंतर धरणाची किरकोळ दुरुस्ती होत होती. 

कायतर म्हणे.. आम्हाला आकाश द्या, चंद्र-सूर्य तारे द्या; सदाभाऊंनी शेतकऱ्यांना फटकारले

परंतु, सततचे महापूर आणि बांधकाम जीर्ण झाल्यामुळे धरणाच्या भिंतींना तडे जात आहेत. मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. धरणाची तातडीने दुरुस्ती केली नाही, तर धरण फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे या धरणाची दुरुस्ती व पुनरुज्जीवन व्हावे ही ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार नवनिर्वाचित सदस्यांनी खासदार पवारांची भेट घेऊन या कामासाठी सरकारकडे पाठपुरवठा करावा, अशी विनंती केली. पवारांनी देखील धरणाच्या सद्यस्थिती आणि दुष्काळी भागासाठी धरणाची असलेली गरज लक्षात घेऊन जलसंपदा मंत्र्यांकडून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती निखील घाडगे यांनी दिली. यावेळी अमिना सय्यद, वसंतराव जाधव गुरूजी, शामराव भोसले, गजानन लावंड, प्रमोद भोसले, विवेक जाधव उपस्थित होते.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News MP Sharad Pawar Recommendation To Minister Jayant Patil For Khatgun Dam