
सिक्कीमच्या धर्तीवर पाचगणीतही पार्किंगची व्यवस्था करण्याची ग्वाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.
भिलार (जि. सातारा) : पाचगणी हे पर्यटनस्थळ जगभर प्रसिद्ध असल्याने शहरानेही काळानुसार बदल स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वर येथे कार्यक्रमानिमित्त आले असताना श्री. पाटील यांनी पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील हॉटेल नमस्ते पुरोहितला भेट दिली. त्यानंतर पाचगणीकरांशी चर्चा केली. त्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष किरण पवार, रोटरी सदस्य भारत पुरोहित, रेन फॉरेस्टचे संचालक राजेंद्र पार्टे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोरभाई पुरोहित, मेहुल पुरोहित व नागरिक उपस्थित होते.
हे पण वाचा- भाजपच्या आमदाराची सभापती रामराजेंसोबत खलबत्ते; राष्ट्रवादीच्या गोटात चर्चांना उधाण
अनौपचारिक गप्पा मारताना श्री. पाटील म्हणाले, "सिक्कीममध्ये राहिलो, तेही पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी शहराची सात लाख लोकसंख्या आहे. या ठिकाणी दरवर्षी 21 लाख पर्यटक भेट देतात. त्या ठिकाणी प्रशासनाने 400 कोटी रुपये खर्च करून दहा मजली पार्किंग उभारले आहे. त्यामुळे तेथील पार्किंगचा प्रश्न मिटला आहे. याच धर्तीवर पाचगणीतही अशा प्रकारची व्यवस्था झाल्यास पार्किंगची समस्या मिटेल.'' राजेंद्र पार्टे, भारत पुरोहित यांनी पाचगणीतील पर्यटन व समस्यांविषयी माहिती दिली. त्यावेळी श्री. पाटील यांनी विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासन दिले. या वेळी अनेक चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे