esakal | ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा! फलटण-पुणे रेल्वेचा आज शुभारंभ, रेल्वेमंत्र्यांचा 'ग्रीन सिग्नल'
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

आज फलटण रेल्वे स्थानकावरून विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीचे उद्‌घाटन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ऑनलाइन होणार आहे.

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा! फलटण-पुणे रेल्वेचा आज शुभारंभ, रेल्वेमंत्र्यांचा 'ग्रीन सिग्नल'

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण ते पुणे रेल्वेसेवेचा प्रारंभ आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निधनाच्या वर्षपूर्तीपूर्वीच ही रेल्वेसेवा सुरू होत असल्याचा व त्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा मला, माझ्या कुटुंबीयांना व फलटणकरांना मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. 

ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या उद्‌घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार वंदना चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार सुनील कांबळे व फलटणच्या नगराध्यक्षा नीता नेवसे आदींची ऑनलाइन उपस्थिती राहणार आहे. 

माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन; साताऱ्यातील पुसेगावात होणार अंत्यसंस्कार

आज (मंगळवार) फलटण रेल्वे स्थानकावरून उद्‌घाटनानिमित्त विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीचे उद्‌घाटन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ऑनलाइन होणार आहे. या गाडीस सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी, सासवड रोड या स्थानकांवर थांबा असणार आहे. अत्यावश्‍यक सेवेतील लोकांसाठी या रेल्वेची नियमित सेवा 31 मार्चपासून सुरू होईल. गाडी क्रमांक 01436 पुणे येथून 5 वाजून 50 मिनिटांनी सुटेल व फलटण येथे साडेनऊ वाजता पोचेल व परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01436 फलटण येथून संध्याकाळी सहा वाजता सुटेल व पुणे येथे साडेनऊ वाजता पोचेल. गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील. 

सातारकर आठच्या आत घरात! संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठा बंद; पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद

नियमित रेल्वे प्रवासासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थानिक प्रशासकीय स्तरावर अत्यावश्‍यक सेवेतील संबंधितांना प्रांताधिकाऱ्यांकडून क्‍यूआर कोड आधारित ओळखपत्रे दिले जातील. पुणे पोलिस आयुक्तांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. जे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून क्‍यूआर कोड आधारित ओळखपत्रे जारी करतील. 

दहिवडीकरांनो सावधान; माण तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट?

ऑनलाइन साक्षीदार व्हावे 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा प्रारंभाचा कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. फलटण- पुणे या रेल्वेच्या प्रारंभाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी www.youtube.com/railminindia या लिंकद्वारे फलटणकरांनी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार निंबाळकर यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image