Don't Worry! माणदेशातील बहुतांश तलावांत मुबलक पाणीसाठा; यंदाचा उन्हाळा होणार सुसह्य

रूपेश कदम
Saturday, 23 January 2021

माणमध्ये जानेवारी महिना अर्धा संपला तरी अजूनही ओढे-नाले वाहत आहेत. आंधळी धरणासह बहुतांशी तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे.

दहिवडी (जि. सातारा) : सतत पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेला तालुका म्हणून माण तालुक्‍याकडे पाहिले जाते. पाण्याच्या टॅंकरमागे धावणारी माणसे हे इथलं नेहमीचंच चित्र. त्याच माणमध्ये जानेवारी महिना अर्धा संपला तरी अजूनही ओढे-नाले वाहत आहेत. आंधळी धरणासह बहुतांशी तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा असून, यंदाचा उन्हाळा सुसह्य होणार आहे. 

मागील काही वर्षांत जलयुक्त शिवार, पाणी फाउंडेशन, प्रशासन, लोकसहभाग आणि त्याला मिळालेली "सकाळ रिलीफ फंडा'ची जोड यामुळे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. सिमेंट बंधारे तर बांधलेच; पण फक्त सिमेंट बंधारे न बांधता माथा ते पायथा असे शास्त्रशुद्ध काम सर्वत्र झाले. सलग समतल चर, खोल सलग समतल चर, माती नालाबांध, बांध बंदिस्ती, नाला खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे आदी जलसंधारणाची कामे करण्यात आली. माणगंगा नदीपात्राचे सुध्दा खोलीकरण करण्यात आले. सोबतच वृक्षारोपणाची कामेही करण्यात आली. या सर्वांचा परिणाम म्हणजे जलसंधारणाच्या संरचना मोठ्या प्रमाणात तयार झाल्या. 

निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर

त्यातच जून 2019 पासून डिसेंबर 2020 पर्यंत पावसाने माणमध्ये तुफान फटकेबाजी केली. अगदी अनेकदा अतिवृष्टीचा तडाखासुध्दा दिला. ओढे-नाले तर वाहिले. माणगंगासुध्दा अनेकदा खळाळून वाहिली. सर्वच बंधारे, माती नालाबांध, पाझर तलाव, आंधळी धरण काठोकाठ भरून वाहिले. पण, यावर्षी फक्त काही दिवस वा आठवडे हे भरून वाहिले नाहीत तर काही महिने यांच्या काठाने पाणी सोडले नव्हते. याला कारण म्हणजे पडलेला पाऊस वेगाने वाहून गेला नाही तर बनवलेल्या संरचनांमध्ये विशेषतः सलग समतल चरांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात मुरले. अन्‌ हे मुरलेले पाणी काही दिवसांनंतर ओघळ, ओढ्यातून नदीत येत राहिले. त्यामुळेच आजअखेर अनेक ठिकाणी पाणी वाहताना दिसत आहे. या असलेल्या भरपूर पाणीसाठ्यामुळे तसेच वाढलेल्या पाणीपातळीमुळे माणच्या जनतेचा उन्हाळा सुसह्य होणार आहे. जनावरांच्या छावण्या तर सोडाच पण अपवाद वगळता पाण्याचे टॅंकरसुध्दा लागणार नाहीत. उलट कधी नव्हे ते उन्हाळ्यातसुध्दा पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. 

धक्कादायक! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात साताऱ्यात दोघांचा मृत्यू

जलसंवर्धन करणे व जलसाक्षर होणे आवश्‍यक... 

माणमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन व वापर करणे आवश्‍यक आहे. उसाच्या लागवडीत झालेली मोठी वाढ व पाट पाण्याने शेती भिजवणे हे माणला परवडणारे नाही. अनिर्बंध पाणीउपसा पुन्हा एकदा माणला पाणी टंचाईकडे नेऊ शकतो. त्यामुळे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, नवीन आलेल्या रेनपाइप यांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. 

‘How’s The Josh’! सातारा जिल्ह्यातील शेतकरी कन्या सैन्य दलात; आसाम रायफलमध्ये निवड

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Plenty Of Water Storage In Manadesha Lakes