
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर होती, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
कोरेगाव (जि. सातारा) : मदन भोसले, जयकुमार गोरे आदींसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा शिरकाव झाला असला, तरी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व कायम आहे. त्यामध्ये कोरेगाव मतदारसंघातील ७७ पैकी ५४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे वर्चस्व असून, सरपंचपदाच्या निवडीनंतर आणखी काही ग्रामपंचायती आमच्या ताब्यात येतील, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मी चळवळीत घडलेला कार्यकर्ता आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडण्यासाठी मी शिकस्त करतच राहणार. कोणी कितीही टार्गेट केले, तरी आणि प्रसंगी कोणालाही अंगावर घेण्याची वेळ आली, तरी मी मागे हटणार नाही, अशा शब्दांत त्यांनी 'जिल्ह्याच्या राजकारणात शशिकांत शिंदे यांनाच टार्गेट का केले जाते?' या प्रश्नाचे उत्तर दिले. दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अंगापूर येथे, तर त्यानंतरच्या काही दिवसांतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवथर परीसरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमांच्या निमित्ताने शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.
Breaking News : उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाच निर्वाळा
कोरेगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ल्हासुर्णे येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीकडे प्रामुख्याने खटाव, सातारा तालुक्यांतील अधिक ग्रामपंचायती आल्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, सातारारोड या ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे नव्हत्या; परंतु त्या ताब्यात घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगली लढत दिली. मात्र, विरोधकांकडून सर्व प्रकारच्या यंत्रणेचा वापर झाल्याने काही जागा अगदी थोडक्या मतांनी गेल्याची माहिती त्यांनी दिली. मलाच टार्गेट का केले जाते, हा तुमचा प्रश्न बरोबर आहे, त्याची प्रचिती गेल्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलीच आहे, सामान्य कार्यकर्ता राजकारणात पुढे येऊ पाहतो, तेव्हा अशा प्रकारच्या अडचणी येतातच, असेही त्यांनी सांगितले. पक्षाने माझ्यावर सातारा जिल्हा आणि नवी मुंबई या दोन ठिकाणची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पक्ष बांधणीचे काम सुरू आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक महविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे, याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले, "सातारा शहरात राष्ट्रवादीच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.
दीपक पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वांना सोबत घेऊन एकत्रितपणे निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे." शशिकांत शिंदे जावळीचे नाहीत, आता ते बाहेरचे म्हणजे कोरेगावचे झाले आहेत, या दीपक पवार यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, "मी जावळीचा व सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे. आता मी विधानपरिषदेवर असल्याने माझे कार्यक्षेत्र व्यापक झाले आहे." महाविकास आघाडी सरकारला धोका आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, "वावड्या उठवणे एवढेच विरोधाकांकडे काम आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून कॉंग्रेसची करण्याचा प्रयत्न करत सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे; परंतु तो यशस्वी होणार नाही." जयंत पाटील यांच्या 'मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते', या विधानावर शशिकांत शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री पदासाठीच्या योग्यतेचे त्यांच्यासारखे अनेक जण आमच्या पक्षात आहेत, असा त्यांच्या वक्तव्यामागचा अर्थ आहे. आमच्या पक्षात अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी शरद पवार हे घेतात." धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत, याविषयी शशिकांत शिंदे म्हणाले, "एखादा कार्यकर्ता, नेता घडायला मोठा काळ जातो. मात्र, बदनामी करून एखाद्या नेत्याला संपवण्याचे अशा प्रकारचे राजकारण चुकीचे आहे."
भाजपचे आमदारही आता खोटं बोलू लागलेत; राष्ट्रवादीच्या पवारांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला
भाजपकडून ऑफरचा दावा
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर होती, असा दावा करून शशिकांत शिंदे म्हणाले, "पश्चिम महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या प्रमुख चेहरा भाजपमध्ये हवा, तुमच्या निवडणुकीसाठी १०० कोटी लागले, तरी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ती ऑफर होती; परंतु राष्ट्रवादीवरील आणि पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यावरील निष्ठा अढळ असल्याने मी भाजपची ऑफर धुडकावली होती."
संपादन : बाळकृष्ण मधाळे