नामांकित नाटक कंपन्यांची साताऱ्यावर फुली; कलामंदिराच्या रखडलेल्या कामाचा परिणाम

गिरीश चव्हाण
Thursday, 21 January 2021

शाहू कलामंदिराच्या दुरुस्ती, सुशोभीकरणाचे महामॅरेथॉन काम गेली अनेक महिने पालिकेकडून सुरू आहे.

सातारा : तांत्रिक, अतांत्रिक कारणांमुळे येथील शाहू कलामंदिराच्या दुरुस्तीचे काम अजूनही रखडलेले असून, ते कधी पूर्ण होईल, याचे उत्तर सध्यातरी पालिका पदाधिकाऱ्यांकडे नाही. पाठपुरावा करूनही दुरुस्तीचे काम मार्गी लागत नसल्यामुळे नामांकित नाटक कंपन्यांनी साताऱ्यावर फुली मारत इतर ठिकाणी नाट्यप्रयोग सुरू केले आहेत. पालिकेच्या विस्कळित कारभारामुळे शाहू कलामंदिरात तिसऱ्या घंटेचा आवाज सध्यातरी घुमणे अशक्‍य आहे. 

शाहू कलामंदिराच्या दुरुस्ती, सुशोभीकरणाचे महामॅरेथॉन काम गेली अनेक महिने पालिकेकडून सुरू आहे. तांत्रिक, अतांत्रिक कारणे, पदाधिकाऱ्यांच्या रुसव्याफुगव्यांमुळे हे काम नंतरच्या काळात रखडले. लॉकडाउनमुळे बंद पडलेले हे काम अनलॉकमुळे पुन्हा सुरू झाले. मात्र, त्याला गती नाही. या कामाला गती मिळावी, यासाठी साताऱ्यातील नाट्यप्रेमी, वितरकांनी याबाबतचे पत्र मुख्याधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्षा माधवी कदम यांना दिले. याच कामाबाबत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वत: फोनवरून अभिजित बापट यांच्याशी चर्चा केली होती. 

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी

या वेळी शाहू कलामंदिराच्या दुरुस्तीचे काम तत्काळ मागीं लावण्याचे आश्‍वासन दामले यांच्यासह इतरांना देण्यात आले. यानंतर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दुरुस्तीचे हे काम 15 दिवसांत पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. श्री. शेंडे यांनी जाहीर केलेले ते 15 दिवस संपले तरी काम अजून बाकी आहे. जानेवारीतील 31 तारखेला एका प्रयोगाची तयारी मुंबईस्थित नाटक कंपनीने सुरू केली होती. मात्र, दुरुस्तीच्या कामामुळे कंपनीने साताऱ्यातील तो प्रयोग रद्द केला.

सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

मार्चमध्ये प्रसिध्द नाटकांचा महोत्सव 

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातील 20 तारखेला एका प्रयोगाचे तसेच मार्च महिन्यातील सात तारखेपासून नटरंगी नार, सही रे सही, अलबत्या गलबत्या, शांतेचं कार्ट चालू आहे, व्हॅक्‍युम क्‍लिनर, एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांचा समावेश असणारा महोत्सव आयोजित करण्याची तयारी सध्या सुरू आहे. त्यांची तयारी सुरू असली तरी दुरुस्तीचे रखडलेले काम या नाट्यमहोत्सवाच्या आड येण्याची चिन्हे आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News The Repair Work Of Shahu Kalamandira Stopped