कऱ्हाडात सौर ऊर्जा प्रकल्प लालफितीत; पालिकेची 90 कोटींची होणार बचत

सचिन शिंदे
Thursday, 18 February 2021

कऱ्हाड पालिकेने सुमारे 13 कोटी 62 लाख 17 हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : नगरपालिकेला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारा सुमारे 13 कोटी 62 लाख 17 हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प शासकीय दिरंगाईसह लालफितीत अडकला आहे. कोरोनामुळे रखडलेल्या निधी वाटपात हा प्रकल्प रखडला आहे. पालिकेच्या पुढच्या 25 वर्षांत वीज बिलांवर होणारा 90 कोटींची खर्चात या प्रकल्पाने बचत होणार आहे. मात्र, दीड वर्षापासून हा प्रकल्प अद्यापही अडकला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरीसह निधीच्या तरतुदीची गरज आहे. 

पालिकेने सुमारे 13 कोटी 62 लाख 17 हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प अहवाल तयार केला. त्यातून पालिका दोन हजार किलोवॉटची ऊर्जानिर्मिती करणार आहे. त्यामुळे पालिकेस वीज बिलात बचत होणार आहे. ही वीज विकताही येणार आहे. पालिकेचा वीज बिलांवर महिन्यास किमान 30 लाख, तर वर्षाला सुमारे चार कोटी खर्च होतो. पुढच्या 25 वर्षांत 90 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तो वाचविण्यासाठी एकाच वेळी 14 कोटी खर्च करून प्रकल्प उभा करण्याचा पालिकेचा मानस आहे. 

पालिकेच्या वेगवेगळ्या 13 पेक्षाही जास्त इमारतींवर छोटे-छोटे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. पथदिवे, सांडपाणी प्रकल्प, नवीन जलशुद्धीकरण केंद्रासह विविध शॉपिंग सेंटर, स्टेडियमसह विविध सौर ऊर्जेवर चालतील, असेही प्रस्तावित आहे. त्याचा पहिला प्रयोग पालिकेच्या इमारतीवर करण्यात आला आहे. तेथे 10 किलोवॉटचा प्रकल्प 100 टक्के अनुदानातून उभा आहे. शासनाच्या ऊर्जा विकास अभिकरणकडून 10 किलोवॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प 100 टक्के अनुदानातून पालिकेस भेट दिला आहे. शासनाने 2013 मध्ये अपारंपरिक ऊर्जेचा प्रसार व प्रचारासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महापालिका, पालिकांसह शासकीय, निमशासकीय इमारतींवर सौर ऊर्जा संच बसवण्याची योजना आखली होती. त्या ऊर्जा विकास अभिकरणाचा लाभ घेण्यासाठी पालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यामुळे ऊर्जा विकास अभिकरणाची पालिकेला मदत होणार आहे. 

हे पण वाचा- आता रामराज्य! इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रस्तावित इमारती

नवीन जलशुद्धीकरण केंद्र, सांडपाणी प्रकल्प, सुपर मार्केट, यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, पालिका बहुद्देशीय हॉल, पालिका शाळा इमारती, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इमारत, स्मशानभूमी परिसर, कृष्णा घाट, छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, छत्रपती संभाजी भाजी मंडईची इमारत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Solar Power Project From Karad Municipality Stopped