
केंजळ येथून विनापरवाना दगड खाणीतून गौण खनिज चोरी करणाऱ्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मेढा (जि. सातारा) : एक जानेवारीपासून विनापरवाना सुरू असलेली केंजळ येथील दगडी खान जावळीच्या तहसीलदार मनीषा आव्हाळे यांनी सील केली. त्यामध्ये रोड वे सोल्यूशन ऑफ इंडिया कंपनीचे क्रशर सील झाले आहे.
अनेक महिन्यांपासून केंजळ येथील डोंगरामध्ये असणाऱ्या या दगड खाणीचा विनापरवाना गौण खनिजाची चोरी करून वाहतूक केल्या प्रकरणाचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणांमध्ये परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार मनीषा आव्हाळे यांनी माहिती घेतली. त्यात गैरप्रकार लक्षात आल्यानंतर बेधडक कारवाई करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर गुन्हा दाखल केला. महाबळेश्वर-पंढरपूर रस्त्याच्या कामामध्ये डंपरने डबरची वाहतूक करत असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी केंजळच्या तलाठ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार खाणीतून दोन डंपर दगड भरून येताना पाहिले. त्यानुसार डंपरबाबत चौकशी करताना दगड वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे चौकशीत समोर आले.
खुशखबर! मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
केंजळ येथून विनापरवाना दगड खाणीतून गौण खनिज चोरी करणाऱ्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोन डपंरमधून आठ ब्रास डबर चोरून गौण खनिजाची वाहतूक केल्याने तहसीलदार कार्यालयाकडून दोन लाख 24 हजार 320 रुपयाच्या दंडाची रक्कम आकारण्यात आली आहे. एक जानेवारीला स्टोन क्रशरचा परवाना मुदत संपूनही नवगीत गडोख याच्या रोड वे सोल्युशन ऑफ इंडिया कंपनीचे क्रशर सुरू असल्याने गौण खनिजाची साडेसहा कोटींची रॉयल्टी न भरल्यामुळे, तसेच दिलेल्या परवान्याची मुदत संपल्यामुळे केंजळचे क्रशर सील केले असल्याची मनीषा आव्हाळे यांनी माहिती दिली.
पैसे थकीत ठेवणे पडले महागात; कऱ्हाडातील जमिनी हाेणार सरकार जमा
संपादन : बाळकृष्ण मधाळे