
या विक्रमाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाऊस ऑफ कलामला पत्र पाठवून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
खंडाळा (जि. सातारा) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च क्युब्ज चॅलेंज 2021 अंतर्गत कलाम इंटरनेशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिंन ग्रुप यांच्या वतीने राबवलेल्या प्रकल्पात भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 100 उपग्रहांचे रामेश्वरम (तमिळनाडू) येथून एका वेळी हेलियम बलूनद्वारे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या ऐतिहासिक व विक्रमी क्षणात साताऱ्यातील हाफिज अश्पाक पटेल (राजेंद्र विद्यालय, खंडाळा) व राजवर्धन पाटील (दादासाहेब उंडाळकर, उंडाळे) या दोघांनी रामेश्वरम येथे प्रत्यक्ष जाऊन दिग्गज शास्त्रज्ञांसोबत सहभाग नोंदवला, तर अथर्व नेवसे, वैष्णवी गायकवाड व ललित वाडेकर या मुलांनी मोबाईल लिंकद्वारे आपली उपस्थिती नोंदवली.
प्रक्षेपणावेळी डीआरडीओ व इस्त्रोचे शास्त्रज्ञ, ब्राह्मो क्षेपणास्त्राचे एमडी डॉ. ए. शिवनाथू पिल्ले, "नासा'चे ब्रॅंड ऍम्बेसिटर व स्पेस झोन इंडियाचे सीईओ डॉ. आनंद मिलिगम, राजन्स टी. व्ही. टॉवरचे डॉ. जोसेफ राजन, एमजीआरचे डॉ. आय. रमेश, मार्टिन ग्रुपच्या डॉ. लीना रोज, डॉ. कलाम यांचे पणतू एपीजेएम शेख सलीम, एपीजेएम शेख दाऊद, प्रकल्पाच्या राज्य समन्वयक मनीषा चौधरी, सचिव मिलिंद चौधरी व बालवैज्ञानिक उपस्थित होते.
तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलसाई सौंदराजन, भारतीय अवकाश संशोधनचे प्रोफेसर वाय. एस. राजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. या विक्रमाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाऊस ऑफ कलामला पत्र पाठवून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, या 100 उपग्रहांपैकी 39 उपग्रह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. प्रक्षेपणापूर्वी भारतीय ध्वजाला मानवंदना देत राज्य समन्वयक मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याच्या विद्यार्थ्यांसह प्रक्षेपणतळापर्यंत "तिरंगा मार्च' काढण्यात आला. साताऱ्यातील मुलांनी विश्वविक्रमात सहभाग नोंदवल्यामुळे साताऱ्याच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे