Mini Lockdown : प्रशासन विरुद्ध जनता 'संघर्ष' उफाळणार; पालकमंत्र्यांनी समन्वयाची जबाबदारी घेणे अपेक्षित

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आवश्‍यक उपाययोजना करण्याची नितांत गरज होती. मात्र, त्यासाठी विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणे आवश्‍यक होते. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत राज्य शासनाने "ब्रेक द चेन'च्या नावाखाली काढलेल्या आदेशाची जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी केली. मात्र, त्याचे सातारा जिल्ह्यात प्रतिकूल पडसाद उमटले आहेत. लोकभावना लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी सर्वांचा समन्वय करून यातून निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रशासन विरुध्द जनता असा संघर्ष जिल्ह्यात उभारला जाण्याची भीती आहे. कोरोनाच्या काळात असे होणे सर्वांसाठी धोक्‍याचे ठरणार आहे. 

जिल्ह्यात आठवडाभरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. शंभर-दोनशे करत बाधितांचा आकडा आता एक हजाराला गाठायला निघाला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रत्येकजण कोरोनाचा मुकाबला करत आहे. कोरोनाशी दोन हात करताना काही निर्बंध पाळून वाटचाल करणे हाच आता उपाय राहिला आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने मिनी लॉकडाउन लागू केले आहे. हे लॉकडाउन करताना गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर शासनाने भर दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही सातत्याने गर्दी होणारी सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. 

केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वच ठिकाणी व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. लॉकडाउन करताना किमान व्यापारी व व्यावसायिकांच्या संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता, अशी सर्वांची भावना आहे. जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखायचा असून, त्यासाठी गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. हा निर्णय घेताना जिल्हा प्रशासनाने कोणत्याही व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली नाही. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे सर्वसामान्यांसह व्यापारी व इतर व्यावसायिक प्रचंड अडचणीत आलेले आहेत. त्यांना लॉकडाउन परवडणारे नाही. त्यातच गुढीपाडव्याच्या सणाच्या तोंडावरच शासनाने मिनी लॉकडाउन केल्याने सर्वांचीच अडचण झाली आहे.

मुळात जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात अनेक त्रुटी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी लागणाऱ्या साहित्य विक्रीची दुकाने बंद ठेवली आहेत. किराणा दुकानाबाबत स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे दुकानांतूनच कोरोनाचा संसर्ग होतोय का, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. मुळात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर निर्बंध आणून कोरोनाचा संभाव्य संसर्ग रोखण्याची उपाययोजना करायला हवी होती. त्यासाठी सर्व घटकांतील व्यक्तींशी चर्चा करून निर्णय घेणे आवश्‍यक होते. मात्र, तसे न करता सरसकट सर्वच दुकाने बंद ठेवल्याने जनतेची अडचण झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह व्यावसायिक रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत आहेत. त्याला काही लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या विरोधात अविश्‍वासाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. परिणामी पालकमंत्र्यांनी यामध्ये मध्यस्थी करून सर्वांच्या समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे आहे. 

सुसह्य वातावरण ठेऊन कोरोना रोखणे सोपे 

कोरोनाशी गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून जिल्ह्यातील जनता तोंड देत आली आहे. कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधांमुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आता आणखी लॉकडाउन करण्याची वेळ आल्यामुळे सर्वसामान्यांपुढे पुन्हा एकदा विविध प्रश्‍न आ वासून उभे राहिले आहेत. हे प्रश्‍न जिल्हा प्रशासन सध्याच्या परिस्थितीत सोडवू शकत नाही. कारण त्यांना कोरोनाची साखळी तोडायची आहे. पण, जनतेला सुसह्य वातावरण राहील, असा निर्णय घेऊन मिनी लॉकडाउन केल्यास कोरोना रोखणे सोपे होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com