
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यात्रा रद्द केली असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच रंजना पवार यांनी केले आहे.
ढेबेवाडी (जि. सातारा) : भाविक वर्गात मोठे महत्त्व असलेली आणि घनदाट जंगलाच्या परिसरात तीन दिवस भरणारी श्री वाल्मीकी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती पानेरी (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीने पत्रकाव्दारे दिली आहे.
ढेबेवाडीपासून सुमारे 30 किलोमीटरवरील जंगल परिसरात महाशिवरात्रीला भरणाऱ्या श्री क्षेत्र वाल्मीकी यात्रेला विविध जिल्ह्यांसह वाड्यावस्त्यांतून भाविक मोठी गर्दी करतात. यात्रा पूर्णपणे शाकाहारी असते. यात्रेकरू व भाविकांसाठी भारुड, भजन, कीर्तनासह पारायण सोहळ्याचे आयोजन असते. ग्रामस्थ, ग्रामपंचायत व श्री क्षेत्र वाल्मीकी देवस्थान ट्रस्टने यात्रा रद्द करण्याचे ठरवल्याचे सरपंच रंजना पवार यांनी पोलिस प्रशासन व संबंधित यंत्रणांना पत्राव्दारे कळविले आहे.
लग्नाला नियमापेक्षा अधिक गर्दी झाल्याने हॉटेल मालकाला 25 हजारांचा दंड
ता. 9 ते 11 तारखेदरम्यान होणारी यात्रा रद्द केली असून भाविकांनी गर्दी करू नये तसेच पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त ठेऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंतीही ग्रामपंचायतीने पत्रात केली आहे. सध्या विविध जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यात्रा रद्द केली असून भाविकांनी सहकार्य करून दंडात्मक करवाईसारखे प्रसंग टाळावेत, असे आवाहन सरपंच रंजना पवार यांनी केले आहे.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे