उत्तर मांड धरण भरून वाहू लागले, अडीच हजार एकर शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी

कृष्णत साळुंखे 
Monday, 10 August 2020

आजवर उत्तर मांड धरण पाणलोट क्षेत्रात 850 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 0.88 टीएमसी, तर 687.50 मीटर पाणी संचय पातळी आहे. धरणाची लांबी एक हजार 420 मीटर तर उंची 44.45 मीटर आहे. 

चाफळ (जि. सातारा) : शेती सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी वरदाई ठरलेले गमेवाडी (चाफळ) येथील उत्तर मांड धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. चाफळ विभागापासून ते उंब्रजपर्यंतच्या जवळपास अडीच हजार एकर शेती सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान या प्रकल्पामुळे दरवर्षी भागत असते. सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरण पूर्ण भरून वाहू लागले असल्याने परिसरातील सर्व शेतकरी व इतर लोक समाधानी आहेत. 

आजवर उत्तर मांड धरण पाणलोट क्षेत्रात 850 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 0.88 टीएमसी, तर 687.50 मीटर पाणी संचय पातळी आहे. धरणाची लांबी एक हजार 420 मीटर तर उंची 44.45 मीटर आहे. धरणाचे बांधकाम 1997 मध्ये सुरू होऊन आज ते पूर्णत्वास गेले आहे. प्रकल्पात 625 एकर जमीन बाधित झाली असल्याने नाणेगाव व माथनेवाडी ही गावे पूर्ण पुनर्वसित झाली आहेत. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने आज सकाळी काही सुवासिनी महिलांनी खणा-नारळाने पाणीसाठ्याची ओटी भरून औक्षण केले आहे.

नदी पात्रामध्ये पाणी वाढल्याने काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. माथनेवाडी येथील उर्वरित 14 घरांचा खास बाब म्हणून पाठवलेला प्रस्ताव आजही प्रलंबित आहे. त्यामुळे धरणात 100 टक्के पाणीसाठा केला जाऊ शकत नाही. माथनेवाडीतील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यास धरणाचे 18 फुटी वक्र दरवाजे बंद करून आणखी धरणामध्ये 18 फुटांनी पाणीपातळीत वाढ होऊ शकते, असे मत शेतकरी रामचंद्र काटे यांनी व्यक्त केले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The North Mand Dam Began To Overflow