सातारा : सत्ताधाऱ्यांच्‍या हातात राहिला एक महिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara-Nagarpalika

सातारा : सत्ताधाऱ्यांच्‍या हातात राहिला एक महिना

सातारा : मनोमिलन मोडत सातारा विकास आघाडीने स्‍वतंत्रपणे निवडणूक लढवत गत निवडणुकीत सातारा पालिकेची सत्ता निर्विवादपणे आपल्‍याकडे खेचत सत्तारोहण केले होते. या सत्तारोहणास येत्‍या २२ डिसेंबरला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्‍यासाठी एक महिना राहिला असल्‍याने पालिकेच्‍या सत्ताधाऱ्यांची विकासकामांसाठीची लगीनघाई सुरू झाली आहे.

गत वेळीच्‍या निवडणुकीच्‍या तोंडावर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यातील मनोमिलन तांत्रिक-अतांत्रिक, राजकीय-अराजकीय कारणांमुळे संपुष्‍टात आले. त्यानंतर प्रचारात सर्वसामान्‍य विरुध्‍द राजमान्‍य असा धुरळा उडवत उदयनराजेंनी सातारा पालिकेची सत्ता एकहाती काबीज केली. पहिल्‍याच सार्वत्रिक निवडणुकीत वेदांतिकाराजेंचा पराभव झाल्‍याने नगर विकास आघाडी बॅकफुटवर गेली. सत्तेच्‍या माध्‍यमातून गेल्‍या ४ वर्षे ११ महिन्‍यांच्‍या काळात सातारा विकास आघाडीने विकासकामांच्‍या माध्‍यमातून येणाऱ्या निवडणुकीची पेरणी केली आहे. अनेक मुद्यांवर ‘साविआ’ला कोंडीत, खिंडीत पकडण्‍याची संधी असतानाही ‘नविआ’ने अनेक वेळा दवडल्याचे वारंवार दिसून आले. आरोप-प्रत्‍यारोप मोडत ‘साविआ’ने सभागृहातील बहुमताच्‍या जोरावर ‘नविआ’चा आवाज क्षीण करण्‍यावर जोर दिला. विरोधी गटाचा आवाज क्षीण करत ‘साविआ’ने सभागृहात आणि सभागृहाबाहेर विकासकामांचा फड मारण्‍यास सुरुवात केली आहे. पालिकेत सध्‍या कार्यरत असणाऱ्या कार्यकारिणीची मुदत या २२ डिसेंबरला पूर्ण होत आहे. सत्तेची ४ वर्षे ११ महिने सरल्‍याने उरलेल्‍या तीस दिवसांत सातारा विकास आघाडीला उरलेली विकासकामे मार्गी लावण्‍याबरोबरच स्‍वबळ पुन्‍हा एकदा वाढविण्‍याचे शिवधनुष्‍य पेलावे लागणार आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

कार्यकारिणीचा कार्यकाळ २२ डिसेंबरला पूर्ण होत आहे. सध्‍या निवडणूक आयोगाच्‍या सूचनेनुसार मूळ भागाची आणि हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्‍या भागांचा समावेश असणारी प्रभाग निश्चितीचे काम सुरू आहे. त्यानंतर मतदार याद्यांचे प्रारुप जाहीर होणार आहे. हा कार्यक्रम जानेवारी‍त जाहीर होण्‍याची शक्‍यता असल्‍याने २२ डिसेंबरनंतर पालिकेवर प्रशासक येणार हे स्‍पष्‍ट झाले आहे.

विशेष सभेकडे जनतेचे लक्ष

कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे सातारा पालिकेच्‍या गेल्‍या दीड वर्षाच्‍या काळात फक्‍त तीनच ऑनलाइन सभा पार पडल्‍या आहेत. मध्‍यंतरीच्‍या काळात ऑफलाइन सभा आयोजित करण्‍यात आली होती. मात्र, कोरोना फैलावाच्‍या कारणास्‍तव ती तहकूब झाली. नुकतीच शासनाने ऑफलाइन सभांना परवानगी दिली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्‍यास एक महिना बाकी असल्‍याने पालिकेची आगामी सभा ऑफलाइन होणार असून त्‍यासाठीच्‍या विषयांची पालिकेत जुळणी सुरू आहे.

loading image
go to top