
सातारा : पाटणला मुसळधारेने बळिराजा सुखावला
पाटण : गेले चार दिवस पश्चिम घाटात संततधार पाऊस सुरू आहे. मात्र, पाटण तालुक्याच्या पूर्व भागात तो कमी होता. आज सकाळपासून संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून नदी, नाले व ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. दमदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने गेली महिनाभर पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळिराजा सुखावला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात गेली चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. मात्र, पाटण, तारळे, चाफळ आणि ढेबेवाडीच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी होतो. दमदार पाऊस पडला नसल्याने शेतातून पाणी बाहेर निघाले नव्हते. ओढे व नाले वाहू लागले नव्हते. फक्त जिरवणीचा पाऊस पडत होता.
आज सकाळी नऊ वाजल्यापासून पूर्व भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. दिवसभर मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पाऊस एकसारखा पडत असल्याने जनजीवन विस्कळित झाले. शेतकऱ्यांनी जनावरे ही आज लवकर घरी आणली.
सव्वामहिना पावसाने दडी मारल्याने ओढे-नाले आटले होते. मात्र, आज दिवसभर पडलेल्या पावसामुळे ते खळखळून वाहू लागले आहेत. शेतात नैसर्गिक उफळे वाहू लागले असल्याने रखडलेल्या भात व नाचणी पुनर्लागणीस आता वेग येणार आहे. कोयना नदीसह तालुक्यातील इतर उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्याने बळिराजा सुखावला आहे.
Web Title: Satara Patan Torrential Rain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..