साता-यातील सराईत घरफोड्या विजय ढोणे कर्नाटकात सापडला

गिरीश चव्हाण
Sunday, 27 December 2020

एलसीबीच्या पथकाने आलीमबुर येथून विजय ढोणेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बिदर परिसरात तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. अटकेतील ढोणेकडून पोलिसांनी 70 हजारांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत.

सातारा : सातारा शहरासह विविध पोलिस ठाण्यात दाखल 12 गुन्ह्यांत फरारी असणाऱ्या विजय सिद्धाप्पा ढोणे (वय 29, रा. आलीमबुर, ता. जि. बिदर, रा. कर्नाटक) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. अटकेतील ढोणेने आणखी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
सातारा शहर पोलिस ठाण्यात 2017 रोजी एक घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता. हा गुन्हा विजय ढोणे याने केल्याचे तपासात समोर आले होते. हा गुन्हा घडल्यानंतर त्याच प्रकारच्या चार फिर्यादी सातारा शहर आणि सात फिर्यादी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्या होत्या. 2017 मध्ये घरफोडी करणाऱ्या ढोणे यानेच हे गुन्हे केल्याचे व तो फरारी असल्याचे तपासात येत होते. फरारी असणाऱ्या ढोणेचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिले होते.

Wow Its So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद

यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक रमेश गर्जे, अंमलदार ज्योतीराम बर्गे, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, प्रमोद सावंत, विशाल पवार, अमित सपकाळ, गणेश कापरे, अजित कर्णे, रोहित निकम, सचिन ससाणे, केतन शिंदे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या पथकाने आलीमबुर येथून विजय ढोणेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बिदर परिसरात तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. अटकेतील ढोणेकडून पोलिसांनी 70 हजारांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police Arrested Burglar Vijay Dhone In Karnataka Crime News