
ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे साताऱ्यात उद्या धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पुसेगाव (जि. सातारा) : ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी (Journalist Arnab Goswami) यांना बालाकोट व पुलवामा यांसारख्या संवेदनशील विषयांची माहिती कशी झाली याची सखोल चौकशी करून गोस्वामी याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेस (Congress) समितीतर्फे सातारा येथे उद्या (शनिवारी) दुपारी 12 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
कॉंग्रेसचे सर्व नेते, प्रदेश प्रतिनिधी जिल्हा पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष व सदस्य, कॉंग्रेसचे जिल्हा व तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य आणि सर्व कार्यकर्ते यांनी दुपारी 12 वाजता जिल्हा कॉंग्रेस समिती मुख्यालयासमोर उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामींच्या वादग्रस्त व्हाॅटस्अॅप चॅटवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील टीका करत केंद्र शासनावर ताशेरे ओढत गोस्वामींवर जोरदार टीकाही केली होती.
संपादन : बाळकृष्ण मधाळे