सत्ता परिवर्तन! वाठार किरोली ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा; भाजपचा दारुण पराभव

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : कोरेगाव तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वाठार (किरोली) ग्रामपंचायतीत सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे विद्यमान सदस्य भीमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता परिवर्तन होऊन सरपंचपदी सुनील दिनकर कांबळे, तर उपसरपंचपदी शंकर पांडुरंग गायकवाड यांची बिनविरोध निवड होऊन ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला. 

वाठार (किरोली) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भीमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री अंबामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड व भाजप पुरस्कृत असणाऱ्या श्री अंबामाता जनशक्ती पॅनेलचा दहा विरुद्ध तीन अशा फरकाने दारुण पराभव करत ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन घडवून आणत ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवला. त्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये अनसूचित जातीचे आरक्षण पडल्याने "श्री अंबामाता ग्रामविकास'च्या सुनील कांबळे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली असून, उपसरपंचपदी "श्री अंबामाता ग्रामविकास'चे शंकर गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

सरपंच, उपसरपंच निवडी पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद यमगर, कृषी सहायक जे. डी. गायकवाड यांच्या हस्ते, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र निकम, तलाठी राहुल होनराव यांच्या उपस्थितीत नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यपदी निवडून आलेल्या ज्ञानदेव गायकवाड, शिवाजी माळी, उषा गायकवाड, स्नेहल शिंदे, अनिता पिसे, मनीषा गुजले, सुनंदा गायकवाड, मालन पवार, मंगल खामकर, धर्मेंद्र गायकवाड, रेवणसिध्द जंगम यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव कामगिरी करण्याचा मानस व्यक्त केला. 

"वाठार किरोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातीलच नव्हे, तर संपूर्ण कोरेगाव तालुक्‍यातील जनतेने आपल्यावर कायम प्रेम केले आहे. त्या प्रेमाची उतराई करण्यासाठी म्हणून नव्हे तर एक कर्तव्य म्हणून आपण सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबर त्यांच्या सुख-दुखात 24 बाय 7 सहभागी होत आलो, गावागावांत विकासकामे करत आलो आहे. जनतेनेही आपल्याला भरघोस पाठबळ देऊन अनेक पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी दिली. समस्त जनतेचा मी कायम ऋणी राहीन. भविष्यात काम करण्यात आपण तुसभर कमी पडणार नाही.'' 

-भीमराव पाटील, सदस्य, सातारा जिल्हा परिषद 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com