कऱ्हाडातील घडामोडींमुळे राजकीय हालचालींना वेग; जनशक्ती-भाजपात आरोप-प्रत्यारोप

सचिन शिंदे
Thursday, 21 January 2021

सभेत सूचना मांडण्यावरून जनशक्ती-भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यावेळी सत्तेत कोण आहे, ते सिद्ध करण्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले.

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने सुन्या-सुन्या व शांततेत होणाऱ्या पालिकांच्या मासिक सभा गाजू लागल्या आहेत. पालिका कार्यक्रमांत गैरहजर राहणारे नगरसवेक आवर्जून उपस्थिती लावत आहेत. आघाडीच्या भूमिकेलाही पाठिंबा देत आहेत. त्या सगळ्या बदलामागे राजकीय हालचाली वलयांकित होताना दिसत आहेत. सहा महिन्यांत वॉर्डात कामे कशी वाढतील, याकडे विशेष लक्ष देऊन प्रतिमा उजळविण्याचाही प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

नुकत्याच पालिकांच्या विषय समितींच्या निवडी झाल्या. त्या निवडीतही आगामी राजकीय हेतू लक्षात ठेवण्यात आल्याचे प्रकर्षाने जाणवले. पालिकेत जनशक्ती आघाडी बहुमतात आहे. त्यांचे 16 नगरसेवक आहेत. त्यातही दोन गट आहेत. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव व उपाध्यक्ष जयवंत पाटील असे दोन गट आहेत. पालिकेच्या मासिक सभेत मात्र एकसंघ असतात. इतरवेळी मात्र, त्यांच्यातील सवतासुभा कायम दिसतो आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्यांनी समन्वयाने केलेल्या निवडी अधिक प्रकर्षाने समोर आल्या आहेत. विषय समित्यांच्या निवडीवेळी नक्की वाद होईल, अशी स्थिती असतानाही यादव, पाटील यांनी समन्वयाने चाल खेळत सत्ताधारी भाजप, विरोधी लोकशाही आघाडीच्या अपेक्षा खोट्या ठरवल्या. विषय समित्यांचे पडसाद दोन दिवसांनी झालेल्या पालिकेच्या सभेत उमटले. सभेत सूचना मांडण्यावरून जनशक्ती-भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यावेळी सत्तेत कोण आहे, ते सिद्ध करण्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. 

कऱ्हाडात जनशक्ती-भाजपच्या नगरसेवकांत जोरदार खडाजंगी; सभेत सूचना मांडण्यावरून गोंधळ

पालिकेतील या घडामोडींमुळे राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात वेगळीच रंगत येऊ लागली आहे. पक्षीय पातळीवर निवडणुका लढविण्याची भाजपने तयारी केली आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी तसे जाहीरही केले आहे. कॉंग्रेस अद्यापही त्याचा विचार करत आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष जनशक्तीतून निवडून आले आहेत. मात्र, सध्या तेही आघाडीपासून अलिप्त आहेत. तिसरे एक अपक्ष इंद्रजित गुजर हे पृथ्वीराज चव्हाण गटासोबत आहेत. श्री. माने यांच्यासोबत ते पालिकेत असतात. सहकार तथा पालकमंत्री यांची लोकशाही आघाडी पालिकेत आहे. त्यामुळे तेही पक्षीय पातळीवर किती सकारात्मक असतील, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, सध्या तरी पालिकेमध्ये प्रशासकीय पातळीवर सिंगल वॉर्ड रचनेची घाई दिसते आहे. त्याचवेळी जनशक्ती, लोकशाही आघाडी व भाजप यांच्यात आम्हीच एकमेकांपेक्षाही वरचढ आहोत, हेच दाखविण्याची घाई दिसते आहे. 

पैसे थकीत ठेवणे पडले महागात; कऱ्हाडातील जमिनी हाेणार सरकार जमा

पालिकेत असे आहे बलाबल... 

  • नगराध्यक्षांसह भाजपचे 4 नगरसेवक, एक स्वीकृत सदस्य 
  • जनशक्ती 16 नगरसेवक, दोन स्वीकृत सदस्य 
  • लोकशाही आघाडी सहा नगरसेवक 
  • पालिकेत तीन अपक्ष आहेत 
  • अपक्षमध्ये जनशक्ती, भाजपला प्रत्येकी एकाचा पाठिंबा तर एक अपक्ष स्वतंत्र आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Monthly Meeting In Karad Municipality