खटावात चिठ्ठीव्दारे उजळलं अनेकांचं नशीब; आई-मुलगा, पती-पत्नीचीही जोडी ठरली सर्वात भारी!

आयाज मुल्ला
Tuesday, 19 January 2021

खटाव तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मातब्बरांनी गड राखले, तर काहींचे चिठ्ठीव्दारे नशीब उजळले आहे.

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पळशी ग्रामपंचायतीत, कॉंग्रेस नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने निमसोड ग्रामपंचायतीत, माजी सभापती संदीप मांडवे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने नागाचे कुमठे ग्रामपंचायतीत, तर भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने येरळवाडी ग्रामपंचायतीत सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. याशिवाय पुसेसावळी ग्रामपंचायतीत सभापती जयश्री कदम, युवा नेते सूर्यकांत कदम, चितळी येथे उपसभापती हिराचंद पवार व जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आपली सत्ता अबाधित राखली. पुसेगाव, कलेढोण, एनकुळ, गुरसाळे, निढळ याठिकाणी परिवर्तन झाले. त्याचबरोबर काहींचे चिठ्ठीमुळे नशीब उजळले आहे.
 
निमसोड ग्रामपंचायतीत श्री. देशमुख यांच्या पॅनेलने नऊ जागा मिळवून वर्चस्व कायम ठेवले. बाजार समितीचे संचालक काकासाहेब मोरे यांच्या पॅनेलने पाच जागा मिळविल्या. नंदकुमार मोरे यांच्या पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. पळशी येथे माजी आमदार घार्गे यांच्या पॅनेलने आठ जागा मिळवून सत्ता कायम ठेवली, तर विरोधी पॅनेलला एक जागा मिळाली. कुमठे येथे विरोधी गटाचा चक्रव्यूह भेदत पिंटू पैलवान यांनी 9 पैकी 9 जागा जिंकत विरोधकांना चितपट केले. येरळवाडी ग्रामपंचायतीत भाजप तालुकाध्यक्ष चव्हाण यांच्या पॅनेलला चार जागा मिळाल्या. विरोधी पॅनेलने तीन जागा जिंकल्या. चितळी येथे राष्ट्रवादीला दहा, तर विरोधी ऍड. हणमंतराव जाधव गटाला पाच जागा मिळाल्या. पुसेसावळी येथे श्री. कदम यांनी बहुतांशी जागा जिंकत आपली पकड कायम ठेवली. कातरखटाव येथे माजी सरपंच तानाजीशेठ बागल, विजयशेठ बागल यांच्या नेतृत्वाखालील जानाई पॅनेलने सहा जागा जिंकल्या, तर विरोधी अजित सिंहासने, विशाल बागल यांच्या नेतृत्वाखालील कात्रेश्वर ग्रामविकास पॅनेलने पाच जागा जिंकल्या.

तशी वेळ आली, तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार; उदयनराजेंचा प्रशासनाला इशारा

एनकूळ ग्रामपंचायतीत पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ परिवर्तन पॅनेलने नऊपैकी सहा जागा जिंकत परिवर्तन घडविले. सत्ताधारी प्रा. अर्जुनराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला तीन जागा मिळाल्या. पुसेगाव येथे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, देवस्थानचे अध्यक्ष मोहनराव जाधव, राष्ट्रवादीचे बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी महाविकास आघाडीने सतरापैकी चौदा जागा जिंकून सत्ता परिवर्तन केले, तर विरोधी माजी उपसरपंच रणधीर जाधव, सेवागिरी ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुनीलशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी जनशक्ती पॅनेलला तीन जागा मिळाल्या. कलेढोण ग्रामपंचायत दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले. सुरेंद्र गुदगे व ऍड. शरदचंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेलने पंधरापैकी नऊ जागा जिंकून सत्तांतर केले, तर विरोधी संजीव साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील हनुमान पॅनेलला सहा जागा मिळाल्या. निढळ ग्रामपंचायतीत चंद्रकांत दळवी यांच्या गटाला धक्का बसला. आमदार महेश शिंदे गटाचे जी. डी. खुस्पे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने नऊ जागा जिंकल्या. जागा मिळवत सत्तांतर केले, तर श्री. दळवी गटाला दोन जागा मिळाल्या. 

Gram Panchayat Results : पवारवाडीत पवारांचा बालेकिल्ला ढासळला; 40 वर्षांनंतर सत्तांतर

चिठ्ठीमुळे नशीब उजळले 

ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्‍यातील पाचवड, हिंगणे, दातेवाडी, मोराळे, गुरसाळे या ठिकाणी दोन उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामध्ये चिठ्ठी काढून उमेदवार विजयी घोषित करण्यात आले. पाचवडमध्ये संगीता घाडगे यांना संधी मिळाली, तसेच गुरसाळे येथे नंदा कोकरे, हिंगणे येथे जावेद मुजावर, मोराळे येथे अश्विनी शिंदे, दातेवाडी येथे मनोहर जाधव यांना संधी मिळाली. समान मते मिळालेल्या उमेदवारांचे चिठ्ठीमुळे नशीब उजाळल्याची चर्चा होती. 

महाबळेश्वर तालुक्यात गड आला, पण सिंह गेला; राष्ट्रवादीला धक्का, भाजपची जोरदार मुसंडी

आई-मुलगा व पती-पत्नी विजयी..!
 
गोसाव्याचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शालन साळुंखे व माजी सरपंच प्रा. रामचंद्र साळुंखे या आई व मुलाला संधी मिळाली, तर येरळवाडी ग्रामपंचायतीत योगेश जाधव व शीतल जाधव या पती-पत्नीला संधी मिळाली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Mother Son Husband And Wife Won The Gram Panchayat Election In Khatav Taluka